परवानगी दिलीच कशी? अँड.अजित देशमुख यांचा सवाल
बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि जमावबंदी लागू असताना चालू असलेले पोलीस अधीक्षक, बीड यांच्या घराचे बांधकाम जन आंदोलनाने अखेर रोखले. सर्व कामांना एक आणि अधिकार्यांच्या कामाला वेगळा नियम कसा असू शकतो. परवानगी देणारावर कारवाई करा, अशी मागणी करताच हे काम आज दुपारी बंद करण्याचे आदेश देण्यात आले. दुपारीच कामावर असलेले मजूर घरी रवाना करून तसे जन आंदोलनास कळवण्यात आले. मात्र परवानगी कुणी आणि कशी दिली, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याची माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित =देशमुख यांनी दिली.
सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातलेले आहे. त्यामुळे बीड येथे संचारबंदी लागू केली आहे. कोरोना बाबत योग्य त्या उपाय योजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील सर्व आस्थापना आणि सर्व बांधकाम यावेळी बंद ठेवण्यात आले आहेत. असे असतानाही पोलीस अधीक्षक, बीड यांच्या घराचे काम जवळपास पंधरा मजुर करत होते.ही बाब योग्य नाही. नियम सामान्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांना समान असायला हवेत. त्यातच पोलीस अधीक्षक यांना बंगला असताना तो आणखी वाढवण्याची आत्ताच गरज काय आहे, हे देखील समजले नाही. त्यामुळे चालू असलेले बांधकाम तात्काळ बंद करून नियमाचे पालन करावे, असे अँड. देशमुख यांनी मुख्य सचिवांसह, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी, बीड यांना कळविले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील जन आंदोलनाने लिहिले होते.निवेदनात पोलीस अधिक्षक, बीड यांच्या घराला लागून चालू असलेले घराचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे. बांधकाम करण्याचे कोणतेही कारण ग्राहय धरण्यात येऊ नये. बांधकामाची परवानगी नगरपालिकेने दिली नसल्याचे समजते. त्यामुळे ही परवानगी नेमकी कोणी दिली ? टॅक्स भरुन घेतलेला आहे का ? याची तपासणी करण्यात यावी. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. आणि निवेदनाचे उत्तरं आम्हास तात्काळ दयावे. असे नमूद करण्यात आले होते. बांधकाम बंद करण्यात आले असले तरी परवानगी कोणी दिली आणि कशी दिली ? याबाबत मात्र अद्याप उत्तर आलेले नाही. याबाबत आपण वरिष्ठांशी संपर्क केलेला असून त्यात पाठपुरावा करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात अन्य काही ठिकाणी जर अजून अधिकार्यांचे बांधकाम चालू असेल तर याबाबत जनतेने आम्हाला कल्पना द्यावी, असे आवाहन देखील अँड. देशमुख यांनी जनतेला केले आहे.
जिल्हाधिकार्यांच्या परवानगीचे काम केले-एसपी
मागील पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या परवानगीने काम सुरु केले आहे. नियमबाह्य काहीही नाही. या कामावर पाचपेक्षा कमी मजूर आहेत असा खुलासा या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलीस अधीक्षक कार्यालयासह शासकीय निवासस्थानातील सुरक्षा कर्मचार्यांना निवारा शेडची गरज होती. यापूर्वी जागा अपुरी होती, त्यामुळे सामाजिक अंतर पाळणे कठीण होते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सुरक्षा कर्मचार्यांना पुरेशी जागा असावी यासाठी जिल्हाधिकार्यांच्या परवानगीने हे काम सुरु केले.
--------------------
Leave a comment