आष्टी । वार्ताहर
‘आम्हाला कोरोना झाला आहे असे तुम्ही सांगितल्याने 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागले’ अशी कुरापत काढून एका डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना तालुक्यातील सावरगाव घाट येथे शुक्रवारी (दि.17) घडली. डॉक्टरच्या फिर्यादीवरुन अंभोरा ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंद झाला, तर विरोधी गटानेही तक्रार दिली. त्यावरुन सहा जणांवर फिर्याद नोंदविण्यात आली.
डॉ.कामराज कारभारी लोणकर (रा.सावरगाव घाट) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री 9 वाजता ते दवाखाना बंद करुन घरी परतण्याच्या तयारीत होते. इतक्यात त्यांच्या दवाखान्यात गावातील पाच जण आले. त्यांनी ‘तुम्ही आम्हाला कोरेाना झाल्याचे सांगितल्यामुळे गावातील लोकांनी व सरपंचांनी आम्हाला 14 दिवस क्वारंटाईन केले’ अशी कुरापत काढून काठी व कत्तीने हल्ला केला. ‘तुम्ही गावात बदनामी केली’ असे म्हणत दगडानेही मारहाण केली. यावेळी डॉक्टरांच्या पत्नीलाही मारहाण केली. डॉ. लोणकर यांच्या फिर्यादीवरुन पिराजी कुटे, शिवाजी कुटे,शोभा कुटे, सोमनाथ कुटे, मारोती कुटे यांच्यावर गुन्हा नोंद केला.
दरम्यान दुसर्या गटातील पिराजी कुटे यांनीही तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार,‘तुम्ही मुंबईहून आलात, तुम्हाला कोरोना झालाय का?’ अशी विचारपूस करुन मानसिक त्रास दिला. याबाबत जाब विचारला म्हणून धारदार शस्त्राने हल्ला केला. या प्रकरणी डॉ. कामराज लोणकर, अनिल लोणकर,रामभाऊ आडसरे,अजित लोणकर, दीपक लोणकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment