कडा । वार्ताहर
कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यामध्ये होऊ नये यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून येणार्या ऊसतोडणी कामगारांची तपासणी करून त्यांना बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश देणार आहेत.यासाठी आष्टी तालुक्यातील चार ठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आले असून या चार चेकपोस्टच्या माध्यमातून ऊस तोडणी कामगारांना आष्टी तालुक्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती तहसीलदार निलिमा थेऊरकर यांनी दिली
रविवारी (दि.19) त्यांनी या चेकपोस्टचा दौरा करून व्यवस्थेची पाहणी केली ,त्याच बरोबर नायब तहसीलदार शारदा दळवी यांनीही पाहणी केली .महसूल विभागाचे बी.सी. धारक आरोग्य विभागाचे डॉ विनोद मूळे, पोलीसविभागाचे सहाय्यक फौजदार डी.एन. सातव,स्वागत कक्षाचे सुरेश धिंदले आदी उपस्थित होते.जिल्हाधिकार्यांनी आदेश दिल्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील या चारहीचेकपोस्टवर विविध टीम तयार करण्यात आले असून या टीमच्या माध्यमातून आलेल्या ऊस तोडणी कामगारांना इन करणे आणि त्याचबरोबर त्यांची व्यवस्था लावणे अशी कामे केली जाणार आहेत.
कशी असणार व्यवस्था
परजिल्ह्यातून येणार्या ऊस तोडणी कामगारांना येताना आपल्याबरोबर वैद्यकीय प्रमाणपत्र आणि परवाना घेऊन यावे लागणार आहे. ऊस तोडणी कामगार जिल्ह्यामध्ये येत असताना चेकपोस्टवरही वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. जर त्यामध्ये एखाद्याला ताप,खोकला, सर्दी यासारखी लक्षणे आढळून आली असल्यास त्या व्यक्तीला थेट विलगीकरण कक्ष अथवा आष्टी येथील दवाखान्यांमध्ये दाखल केले जाणार आहे.पोस्टवर त्यांच्या या प्रमाणपत्रांची तपासणी त्याचबरोबर त्यांची नावे लिहून घेऊन त्यांना विविध गावात तयार केलेल्या अलगिकरण कक्षापर्यंत नेले जाणार आहे.
हे आहेत आष्टी तालुक्यातील मार्ग
चिचोंडी पाटील, वाघळुज, धानोरा मार्गे कडा आष्टी
दौलावडगाव धामणगाव मार्गे अमळनेर
वाकी मार्गे आष्टी
खडकत मार्गे आष्टी
-----
Leave a comment