बीड | वार्ताहर

लॉकडाऊनमुळे ऊस तोडणीसाठी राज्याच्या विविध भागात गेलेल्या व तिथेच अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून बाहेरून येणाऱ्या या मजुरांच्या  आरोग्य तपासणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यात येणाऱ्या  मजुरांना पुढील तब्बल 28 दिवसांसाठी होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. तसे आदेशच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनही अधिक सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील सर्व 19 चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना या ऊसतोड मजुरांना जिल्ह्यात प्रवेश देताना काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जे ऊसतोड कामगार जिल्ह्यात परतणार आहेत त्यांच्याकडे वैद्यकीय तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आहे का ? याबाबतची खात्री चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना करायची आहे.याबरोबरच संबंधितांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी चेकपोस्टवरच केली जाणार आहे; दरम्यान येणाऱ्या प्रत्येक मजुराच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे. शिवाय पुढील 28 दिवसाची तारीख त्यावर टाकली जाईल, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मजुरांचे इन्फ्रारेड थर्मामीटरने तापमान मोजले जाईल. तापमान जर 100 पेक्षा अधिक असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मजुरांची तपासणी होईल. नियुक्त असलेल्या शिक्षकांनी मजूरांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार सक्षम असलेल्या मजुरांना जिल्ह्यातील त्यांच्या गावात अलगीकरणाची व्यवस्था जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसारच  होईल. मजुरांच्या अलगीकरणाचा कालावधी जिल्ह्यात आल्यापासून पुढील 28 दिवसांचा असणार आहे. त्यानंतरच त्यांना अलगीकरणातून मुक्त केले जाणार आहे.

दरम्यान जिल्ह्यात परतणाऱ्या कोणत्याही मजुराला काही लक्षणे आढळून आल्यास संबंधिताला व त्यासोबत आलेल्या सर्व जणांना चेकपोस्टवरून संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले जाईल. मजुरांना शेतात किंवा शाळेत पाठवण्यापूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबत त्यांचे समुपदेशन करावे अशा सूचनाही आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

या समुपदेशनाबाबतच्या हस्त पत्रिकाही त्यांच्याकडे सोपवल्या आहेत.मजुरांची आरोग्य तपासणी करत असताना चेकपोस्टवर एक रुग्णवाहिका तसेच पुरेसा आवश्यक औषधीसाठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावी परतणार्‍या सर्व मजुरांची व नागरिकांची दोन प्रतित गावनिहाय यादी तयार केली जाणार आहे.तसेच परतणाऱ्या या मजुरांची नोंद एका ॲपमध्ये घेतली जाणार आहे, नंतर ही यादी संबंधित गटविकास अधिकार्‍यांकडे सादर केली जाईल.जिल्ह्यात परतताना दिलेल्या सूचनांचे व आदेशाचे अनुपालन न करणाऱ्या विरुद्ध कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. 

एकोणीस चेक पोस्टवर होणार तपासणी

बीड जिल्ह्यात परतणाऱ्या ऊसतोड मजुरांची जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 19 चेकपोस्टवर तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, शिक्षक व पर्यवेक्षीय अधिकारी 8 तासांच्या तीन शिफ्टमध्ये कर्तव्यावर राहणार आहेत.जिल्ह्यातील चौसाळा, गंगाखेड रोड, मातोरी, मानूर, सौताडा, अनपटवाडी, साकत रोड, गंगामसला, सादोळा, बोरगाव, माळेगाव, खामगाव ब्रीज (शहागड पुल), महारटाकळी, बर्दापूर, देवळा, दौलावडगाव, वाघळूज तांडा, वाकी आणि खडकत या चेकपोस्टवर ही तपासणी केली जाणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.