बीड | वार्ताहर
पुण्याहून परभणीला आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह संपर्कात आलेल्या मातोरी चेक नाक्यावरील 12 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. या व्यतिरिक्त इतर दोन असे एकूण 14 रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी ही माहिती दिली.
परभणी येथे आढळलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णाने बीड जिल्ह्यातून प्रवास केला होता.मातोरी चेक नाक्यावरील पोलीस अधिकारी, काही कर्मचारी तसेच आरोग्य, कृषी व शिक्षण विभागाच्या कर्मचार्यांसह दोन ग्रामस्थ असे एकुण 12 जण रूग्णाच्या संपर्कात आले होते. त्या सर्वांना जिल्हा रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. दरम्यान त्या सर्वांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्या सर्वांचे रिपोर्ट शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. मातोरी चेक पोस्टवरील बारा जण व इतर दोघे असे एकूण 14 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून पाठवलेले 156 अहवाल कोरोना निगेटिव्ह ठरले आहेत. यात जिल्हा रुग्णालयातील 116 तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील 40 अहवालाचा समावेश आहे असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यामुळे बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे.
Comments (2)
दिलासादायक बातमी
दिलासादायक बातमी
Leave a comment