बीड | वार्ताहर
संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत नागरिकांनी दुचाकी घेऊन घराबाहेर न पडता पायी चालत जाऊन जवळच्या भागातून जीवनावश्यक सेवा प्राप्त कराव्यात असे अपेक्षित आहे. मात्र दुचाकीवरून घराबाहेर पडणाऱ्या लोकांनी या आदेशकडे दुर्लक्ष केले, अशा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. बीड शहरासह जिल्ह्यातील नऊ पोलिस ठाणे हद्दीत शुक्रवारी (दि.17) एकूण 246 दुचाकी जप्त करण्यात आल्या. दरम्यान याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला दिले आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी सात ते साडे नऊ या वेळेत संचारबंदी शिथिल असताना काही लोक दुचाकी वाहने घेऊन घराबाहेर पडत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. नंतर पोलिसांनी संबंधितांच्या दुचाकी जप्त केल्या. यामध्ये बीड शहर हद्दीत 53, पेठ बीड 14, शिवाजीनगर 50, बीड ग्रामीण 5, पिंपळनेर 40 अंबाजोगाई ग्रामीण 23, अंबाजोगाई शहर 50, परळी शहर 5 तर संभाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत 6 अशा एकूण नऊ पोलिस ठाणे हद्दीत 246 दुचाकी जप्त करण्यात आल्या, तसेच संबंधितांविरुद्ध कलम 188, 269 व 270 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment