जिल्हाबंदी आदेशाची होणार प्रभावी अंमलबजावणी
सरपंच-ग्रामसेवकांच्या पुढाकारातून स्थापना
बीड | वार्ताहर
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता बीड जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी सर्व त्या व्यापक उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत. जिल्ह्यात सध्या संचारबंदी, जमावबंदी आणि जिल्हाबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. 24 मार्चपासून इतिहासात प्रथमच बीड जिल्हा लॉकडाऊन आहे, अशावेळी परजिल्ह्यातून कोणीही नागरिक बीड जिल्ह्यात प्रवेश करणार नाही यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी (दि.16) प्रत्येक गावच्या सरपंच आणि ग्रामसेवकांना गावामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक ग्रामसुरक्षा पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या पथकांमध्ये गावातील दोन तरुणांची नेमणूकही केली जाणार आहे.
सीईओ अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.संकटाच्या काळात आपण आपल्या गावात सोबत राहत असल्याने व विविध उपाययोजना करत असल्याने गावकऱ्यांचे मनोबल निश्चितच उंचावले असल्याचे सांगत अजित कुंभार यांनी लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवला असल्याने यानंतरच्या कालावधीसाठी अधिक सतर्क राहून ग्रामसुरक्षा पथकाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाय योजना आणखी कडक कराव्यात अशा सूचनाही दिल्या आहेत.
ग्रामसुरक्षा पथकातील सदस्यांची नेमणूक संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने केली जावी. तसेच हे आदेश तात्काळ संबंधित गाव ज्या पोलिस ठाणे हद्दीत असेल तेथील पोलिस निरीक्षक यांच्याकडे पाठवावेत. पथकातील सदस्यांनी निवडणुकीच्या आदेशाची एक प्रत व फोटो आयडी सोबत बाळगावा. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशास प्रतिबंध करत असताना या नागरिकांना जिल्हाधिकारी यांचा जिल्हाबंदी आदेश समजून सांगावा; त्यानंतरही कोणी गावात प्रवेशाचा हट्ट करत असेल तर अशा व्यक्तीची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्याला द्यावी. पथकातील कोणत्याही सदस्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकाला शिवीगाळ अथवा मारहाण करू नये अशा सूचनाही सीईओ अजित कुंभार यांनी पथकाला दिल्या आहेत.
नियमबाह्य पद्धतीने गावात प्रवेश केलेल्या जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींची स्वतंत्र व्यवस्था गावातील शाळेत किंवा गावच्या सभागृहात केली जावी. याबरोबरच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना आणि व्यक्तींना कोणीही प्रतिबंध करू नये मात्र त्यांची नोंद नोंदवहीमध्ये ठेवावी. गावातील जे नागरिक कामानिमित्त पुणे मुंबई औरंगाबाद अहमदनगर व इतर ठिकाणी आहेत त्यांना आहे त्याच ठिकाणी थांबून याविषयी फोनवरून सूचना पथकाने द्यावी. तसेच जिल्हा प्रवेशबंदी असल्याचेही त्यांना कळवावे. आपल्या गावात सरपंच आणि ग्रामसेवकांनी 100 टक्के संचारबंदी व जमावबंदीचे पालन करावे. हे सर्व करत असताना गावातील वृद्ध गर्भवती स्त्रिया, बालके, विविध आजाराने पीडित लोकांची काळजी घ्यावी, त्यांना घराबाहेर पडू देऊ नये. आवश्यक गरजांचा पुरवठा घरीच होईल याची दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामसुरक्षा पथक तैनात होणार असल्याने आता परत जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यास मोठी मदत होणार आहे.
मिळालेल्या संधीचे सोने करा
कोरोनाचे हे संकट म्हणजे गावाच्या सेवेसाठी आपल्याला मिळालेली एक संधी आहे.त्यामुळे गावातील कोणाविषयी कुठलीही सूडबुद्धी अथवा द्वेष मनात न ठेवता आपल्या गावात शांतता व सलोखा कायम राहील याची दक्षता घेऊन जिल्हाधिकारी यांच्या सर्व आदेशाचे काटेकोर पालन केले जावे असे आवाहनही सीईओ अजित कुंभार यांनी सर्व सरपंच व ग्रामसेवकांना केले आहे.
24 तास पथक राहणार कार्यरत
राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येकाकडून व्हावी यासाठी जिल्ह्यात ग्रामसुरक्षा पथक स्थापन केले जाणार आहे. या पथकामध्ये गावातील सुजान व सतर्क अशा दोन-तीन युवकांचा समावेशही केला जाणार आहे. गावात बाहेरून येणाऱ्या सर्व रस्त्यांवर, गाडी मार्गांवर व पाय वाटांवर सरपंच व ग्रामसेवकांनी चेक पोस्ट तयार करावे. याठिकाणी दोन शिफ्टमध्ये 24 तास पथक कार्यरत ठेवावे. तसेच पथकातील सदस्यांनी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Leave a comment