लॉक डाऊन काळात मागच्या दाराने सुरु होती दारु विक्री
माजलगाव ( प्रतीनिधी ) लॉकडाऊनच्या कालावधीत दारूविक्री केल्यामुळे माजलगाव तालुक्यातील तालखेड तालुका माजलगाव येथील सुंदर जाधव यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक, माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या पथकासह दि. ०१ एप्रिल रोजी मौजे तालखेड येथे चार इसमांना दुचाकीवरुन देशी दारूची वाहतूक करताना पकडले. सदरची दारू तालखेड येथील सुंदरराव जाधव यांच्या देशीदारु दुकानातून आणल्याचे आरोपींनी कबूल केले. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर देशीदारु दुकानाचे निरीक्षण केले असता पोलिस विभागाने जप्त केलेली दारूच्या बाटल्यांचे बॅच
क्रमांक सुंदरराव जाधव यांच्या देशी दारु दुकानाच्या मद्य साठ्याशी जुळून आल्याने अनुद्यप्ती धारकाकडून महाराष्ट्र देशी दारू नियम १९७३ च्या नियमांचे तसेच जिल्हाधिकारी, बीड यांच्या लॉकडॉऊन कालावधीत सर्व मद्यविक्री अनुद्यप्त्या बंद ठेवण्याचे आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने सदरचे देशी दारू
दुकान सीएल - ३ अनुज्ञप्ती क्रमांक ५२ तात्काळ निलंबित करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मीक यांनी दिली. तसेच बंदच्या काळामध्ये कुणीही चोरीच्या मार्गाने दारु विक्री करु नये
अन्यथा कारवाई करण्यात येईल असे अवाहन ही त्यांनी केले आहे.
Leave a comment