बीड: सबंध देश सद्यस्थितीत कोरोनाशी मुकाबला करत आहे. 24 मार्चपासून बीड जिल्हा इतिहासात प्रथमच लॉकडाऊन आहे. या बिकट स्थितीत नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी सर्व, वैद्यकीय अधिकारी, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील सर्वच घटक सातत्याने आपला कर्तव्य धर्म यशस्वीरित्या पार पाडत आहेत. या सर्वांच्या बरोबरीने बीड जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी कोरोनाशी एकदिलाने लढा देत आहेत.
नागरिकांनी घरातच बसून कोणाशी लढा द्यावा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. बाहेर जिल्ह्यातून कोणतेही वाहन अथवा व्यक्ती जिल्ह्यात येता कामा नये यासाठी चेकपोस्टपासून ते आयसोलेशन वार्डापर्यंत पोलीस कर्मचारी ड्युटी बजावत आहेत. साहजकिच या सर्वांच्या सुरक्षा कवचाखाली सद्य स्थितीत बीड जिल्हा निश्ंिचत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवू नये. जिल्हा प्रशासनाच्या अधिसूचनेंचे उल्लंघन कोणाकडूनही होवू नये यासाठी पोलीस दल काम करत आहे. हाच धागा पकडत गुरुवारी बीड पोलीस दलाने एक रेखाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित केले आहे. ज्यात बीड जिल्ह्याचा नकाशा त्याभोवती दाखवलेले पोलीसांचे हात, अन् जिल्हा पोलीसांच्या कवचाखाली सुरक्षित असल्याचे सांगत जिल्ह्यात कोरोनाचा ससंर्ग रोखण्यासाठी होणारे प्रयत्न,असा संदेश देण्यात आला. समाजमाध्यमावरील हे रेखाचित्र नागरिकांनाही भावले आहे.
Leave a comment