शिरूर कासार । वार्ताहर
मुंबई, पुणे या ठिकाणी जास्त कोरोना रुग्ण असल्याने तेथील तालुक्यातील मूळ रहिवाशी असलेले नागरिक गावाकडे येण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करताना दिसत आहेत.
या नागरिकांना कोरोना विषाणूचा मुंबई-पुणे या शहरांमध्ये वाढलेला प्रसार पाहून गावाची ओढ लागली आहे. मात्र या नागरिकांना ग्रामीण भागात येण्यासाठी अनेक अडचणी आहेत. असे असले तरी हे दिव्य पार करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या युक्त्या करून आपापल्या गावी पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे. काहीजण प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून आपल्या गावी पोहोचण्यात यशस्वी होतात तर काही जण नियमानुसार वेगवेगळी कारणे सांगून परवाने मिळवून गावी पोहोचत आहेत. दूध डिझेल आणि मिळेल तिथपर्यंत उपलब्ध असलेल्या वाहनांनी मजल दर मजल करत मुंबई-पुणेकर आपल्या गावी पोहोचत आहेत. जिथपर्यंत वाहन मिळेल तिथपर्यंत वाहनाने प्रसंगी जास्तीचे पैसे देऊन प्रवास करून गावचा रस्ता मुंबई पुणेकरांनी धरल्याचे दिसत आहे. गाडी न मिळाल्यास काही अंतर पायी चालण्याचे कष्टही काहीजण घेत आहेत. दरम्यान घाटशील पारगाव येथे 13 नागरिक मुंबईहून पोहोचण्यात यशस्वी झाले. त्यांनी स्वतःच्या वाहनाने प्रवास केला असून परवानाही मिळवलेला आहे. इथे आल्यानंतर शिरूर येथील आरोग्य विभागाने त्यांची तपासणी केली आणि त्यांना होम कोरंटाइंन केले आहे. या सर्वांवर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
Leave a comment