बीड । वार्ताहर
बीड नगरपालिकेने तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या माध्यमातून शहरातील भाजीपाला आणि फळांचे दर उद्या दि.17 एप्रिलसाठी जाहीर केले आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी काढले. दरम्यान अंबाजोगाई, आष्टी, शिरुर येथेही अशाच प्रकारे विविध भाज्यांचे विविध दरपत्रक जाहीर केले गेले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या नियुक्त केल्या आहेत. या समितीने भाजीपाला आणि फळे विक्रीचे दर ठरवून दिले आहेत. बीड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. गुट्टे यांनी गुरुवारी सदरील भाजीपाल्यांचे भाव जाहीर केले. प्रतिकिलो दर पुढीलप्रमाणे आहेत. कांदा 20 रुपये, बटाटे 20 रुपये, लसूण 120 रुपये, वांगी 20 रुपये, टोमॅटो 15 रुपये, भेंडी 30 रु, काकडी 20 रु, शेवगा 20 रु, शिमला 30 रु, हिरवी मिरची 30 रु, आले 60 रु, गाजर 30 रु, बीट 30 रु, मेथी 30 रु, पालक 30रुपये, कोथिंबीर 40 रु, द्राक्ष 40 रु, आंबा 80 रु, खरबूज 20 रु, टरबूज 20 रु, केळी 20 रुपये डझन याप्रमाणे दर ठरवून दिले आहेत. यापेक्षा जास्त दराने कोणी भाजीपाला व फळ विक्री केल्यास संपर्क करावा असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.गुट्टे यांनी केले आहे.
Leave a comment