बीड । वार्ताहर
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे गोरगरिबांची उपासमार होत आहे. होत असलेली ही उपासमार रोखण्यासाठी बीडच्या आमदार संदीप क्षीरसागर 10 हजार कुटुंबियांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. गुरुवारी बीड शहरातील गोरगरीब नागरिकांना एक महिन्याचे रेशन आमदार क्षीरसागर यांनी वाटप केले आहे. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, सुनील धांडे, उषा दराडे, तहसीलदार किरण आंबेकर यांची उपस्थिती होती.
कोरोना विषाणूशी संपूर्ण जग लढत आहे. अशा परिस्थितीत गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन स्वस्त धान्य गोरगरिबांन पर्यंत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र आज उद्भवलेली परिस्थिती अत्यंत बिकट आहे. यामुळे स्वतः बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी रस्त्यावर उतरून हातावर पोट असलेल्या गोरगरिबांच्या मदतीसाठी आपली टीम कामाला लावली आहे. गुरुवारी बीड तालुक्यातील रेशन कार्ड नसलेल्या गोरगरीब नागरिकांना एक महिन्याचे रेशन वाटप केले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासनाला देखील हातभार लागला आहे. रेशन धान्याबरोबर बीड तालुक्यातील निराधारांच्या मानधन संदर्भात देखील ठोस असे निर्णय घेण्यात येणार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले अशा बिकट परिस्थितीत दहा हजार कुटुंबीयांना आ.संदीप क्षीसागर यांनी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा बिकट परिस्थितीत आम्हाला एक महिन्याचे रेशन मिळाले असल्याचे लाभार्थी सोमनाथ काळे, अण्णा शिंदे या लाभार्थ्यांनी सांगितले. झारखंडच्या खासदारांनी सुप्रियाताईंना फोन केला आणि संदिप क्षीरसागरांनी गजानन सहकारी सुतगिरणीतील 62 मजुरांनाही मदत केली. बीड तालुक्यातील गजानन सहकारी सुतगिरणीतील 62 मजुरही लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडले होते. या संदर्भात त्या मजुरांनी झारखंडमधील आपल्या मतदार संघातील खासदारांशी संपर्क करून मदतीची मागणी केली होती. झारखंडच्या त्या खासदारांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळेंना फोनवरून संबंधीत मजुरांना मदतीची गरज असल्याने सांगितले. त्यावरून खा.सुप्रियाताईंनी तातडीने आ.संदीप क्षीरसागरांना फोन करून सुतगिरणीतील मजुरांना मदत पुुरवण्याच्या सुचना दिल्या. आ.संदिप क्षीरसागरांनीही सुतगिरणीतील 62 मजुरांना अन्न-धान्याची मदत पोहोच केली.

Leave a comment