; मालकाला सांगितले दुकानात झाली चोरी
केजमध्ये देशी दारू दुकानाच्या नोकराविरुद्ध गुन्हा
केज । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारू विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना लॉकडाऊनमध्ये केज येथील देशी दारू दुकानाच्या नोकराने लाखो रुपयांची दारू विक्री केली. तर हे कृत्य उघडकीस आल्यास दुकानाचा परवाना रद्द होऊ शकतो, म्हणून त्याने चक्क चोरीचा बनाव केला. मात्र पोलिसांनी कसून चौकशी करून हा चोरीचा बनाव उघडकीस आणला. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
केज येथील बस स्थानक परिसरात बायसखू मारोती सोनवणे (रा. उमरी ता.केज) यांचे देशी दारूचे दुकान आहे. ते दुकान बीड येथील माणिक बन्सी परभणे यांनी चालविण्यास घेतले होते.तर दुकानावर तेलंगणा राज्यातील सायकुमार नरसागौड बत्तीनी (रा.पोतगल ता. मुस्ताबाद जि. सिरसिल्ला) हा सात वर्षांपासून नोकर आहे. या दुकानात भरपूर प्रमाणात देशी दारूचा साठा होता. त्यातच कोरोना व्हायरसचा संसर्ग आल्याने संचारबंदी आणि लॉकडाऊन लागू करण्यात आले. जिल्हाधिकार्यांनी दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, चार एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दारूबंदी अधिकारी होनमारे यांनी सदर देशी दारु दुकानास भेट देऊन स्टॉक रजिस्टर चेक केले असता त्यांना दारुचे 189 बॉक्स कमी असल्याचे आढळून आल्याने त्यांनी दुकानास सील ही केले होते. मात्र 15 एप्रिल रोजी नोकर सायकुमार नरसागौड बत्तीनी याने पोलीस ठाण्यात येऊन दुकान चोरट्यांनी फोडल्याची माहिती पोलिसांना दिली. तत्काळ पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, बिट जमादार रुक्मिण पाचपिंडे, गुप्तचर शाखेचे मतीन शेख यांनी दुकानास भेट देऊन पाहणी केली. मात्र हा चोरीचा प्रकार बनावट असल्याचा संशय आल्याने पोनि त्रिभुवन यांनी नोकर बत्तीनी याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी झाली नसल्याचे कबुल करीत 25 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान विकास वाघमारे यास 169, चांदणी बीअरबार येथील वेटर नामे सोन्या याला पाच आणि पारधी लोकांना 15 बॉक्स असे एकूण 181 देशी दारुचे बॉक्स विक्री केल्याचे सांगितले.लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून देशी दारू केल्याने दुकानाचा परवाना रद्द होऊ शकतो या भीतीने चोरीचा बनाव करणार्या नोकराचे पोलिसांनी काही तासातच पितळ उघडे पडले. त्यामुळे देशी दारू दुकानाच्या नोकराने चोरीची लढविलेली शक्कल त्याच्याच अंगलट आली आहे. खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून दारू विक्री केल्याप्रकरणी सायकुमार नरसागौड बत्तीनी याच्याविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Leave a comment