आरोग्य विभागाची माहिती
बीड । वार्ताहर
अंबाजोगाईतील स्वाराती विलगीकरण कक्षातील ओडिसाच्या मजुराचा यकृताच्या तर महारटाकळी (ता.गेवराई) येथील रुग्णाचा फुप्फुसाच्या आजाराने मृत्यू झाल्याचे निदान आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. महत्वाचे हे की, दोन्ही रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले होते. म्हणूनच त्यांचा कोरोनाशी संबंध नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. शिवाय दोघे कोरोना संशयित असल्याने उत्तरीय तपासणी केली गेलेली नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महारटाकळी येथील 38 वर्षीय व्यक्ती औरंगाबादहून आल्यानंतर त्याला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्यास गेवराई उपजिल्हा रुग्णालयातून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते, संबंधिताचा स्वॅबही पाठविला. तो निगेटिव्हही आला. मात्र अचानक प्रकृती खालावून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एकदा स्वॅब घेऊन पुण्याला पाठविला. तो देखील निगेटिव्ह आला. त्याचा मृत्यू हा कोरोनामुळे नव्हे तर त्याला अस्थमा, फुफ्फुसाचा आजार असल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर यापूर्वीपासून उपचार सुरू होते. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. अंबाजोगाईतही ओडिसा राज्यातून आलेल्या कामगाराचा आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत्यू झाला होता. त्याचा स्वॅब घेतल्यानंतर अहवालही निगेटिव्ह आला होता. त्यामुळे हा मृत्यूही कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्याला यकृतचा आजार होता. त्यामुळे त्याची अचानक प्रकृती खालावली आणि मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
दोन्ही रुग्णांचा कोरोनाशी संबंध नाही-डॉ.अशोक थोरात
दोघा मयतांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा कोरोनाशी संबंध नाही. गेवराईतील व्यक्तीला फुफ्फुसाचा आणि अंबाजोगाईतील कामगाराला यकृतचा आजार होता.त्यांच्यावर अगोदरच उपचार सुरू होते. दोघेही कोरोना संशयित असल्याने शवविच्छेदन केले नाही अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
आणखी 5 रिपोर्ट निगेटिव्ह;
तिघांचे अहवाल प्रलंबित
बीड जिल्ह्यात बुधवारी जिल्हा रुग्णालयातून 2 तर अंबाजोगाईतून 6 असे एकुण 8 संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवलेले आहे. यातील 5 जणांचे रिपोर्ट सायंकाळी कोरोना निगेटिव्ह आले तर उर्वरित तिघांचे अहवाल येणे प्र्रलंबित आहेत. दरम्यान गृह अलगीकरणात 55 तर संस्थात्मक अलगीकरणात 110 जण आहेत. बुधवारपर्यंत (दि.15) 140 थ्रोट स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यात बीड जिल्हा रुग्णालयातून 100 तर अंबाजोगाई स्वारातीमधून 40 जणांचे स्वॅब पाठवले आहेत. पैकी 137 स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तिघांचे अहवाल आज गुरुवारपर्यंत प्राप्त होणार असल्याचे डॉ.राधाकिशन पवार म्हणाले.
Leave a comment