जिल्हाधिकारी यांनी नव्या उपाययोजना करण्याची गरज
बीड । वार्ताहर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीची संकल्पना चांगली असली तरी आजच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अनेक शेतकर्यांचे बेहाल झाले. आवश्यक त्या नोंदणीकृत, शेतकरी गट, शेतकरी संघ यांच्यासाठी ही सुविधा नक्कीच द्यावी मात्र जो शेतकरी दोन गुंठ्यामध्ये एखादा भाजीपाला पिकवतो तो शेतकरी पाटीभर भाजीपाला आणुन शहरातल्या रस्त्यावर बसुन विकतो त्या शेतकर्याने पास आणायचा कोठून ? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
रस्त्यावर नागरिकांची गर्दी होवू नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हा निर्णय घेतला. मात्र बुधवारी (दि.15) पहिल्याच दिवशी शेतकर्यांसह नागरीकांचेही हाल झाले. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय झाला असला तरी कृषी कार्यालयाच्या बाहेर मात्र लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. ग्रामीण भागातू आलेला शेतकरी पास कुठं मिळतोय ? अशी विचारणा करू लागला आहे. एकतर त्यांना शहरात यायला वाहने नाहीत, त्याच्याकडे पासेस नाहीत, आलाच तर कृषी कार्यालयाच्या ऑफीसपर्यंत जायला रिक्षा ही नाही. साधे पाणी सुद्धा कोठे प्यायला मिळत नाही आणि त्यात पोलिसांचीही भिती अशी सारी स्थिती निर्माण होत आहे. शहरात येण्यासाठी वाहने नाहीत, कृषी विभागाचं ऑफीस कोठे आहे ते सुद्धा माहित नाही, सातबारा मिळत नाहीत, मिळाल्यास तर त्याची झेरॉक्स घ्यायची कोठून ? परवान्याचा फॉर्म भरण्यासाठी फोटो कोठुन आणायचा ? असे एक ना अनेक प्रश्न कायम आहेत. जिल्हा प्रशासनाने शेतकर्यांचीही सोय होईल अशा काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. अशा स्थितीत शेतकर्यांवर बंधने नकोत.
जिल्हाधिकार्यांचा आदेश शेतकर्यांपर्यंत पोहचला पाहिजे
जिल्हा प्रशासनाचा शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीचा निर्णय चांगला असला तरी शेतकर्यांचे मात्र प्रचंड हाल झाले. जिल्हा प्रशासनाने रात्री उशीरा रस्त्यावर भाजीपाला विकण्यास मनाई केल्याचे आदेश काढले. त्यानंतर शेतकर्यांनी बुधवारी सकाळी अडीच तास सुट मिळणार म्हणुन भाजीपाला, फळे काल सायंकाळी तोडून ठेवले होते. बुधवारी सकाळी ते शहरात आले असता त्यांना कोठेच विक्रीसाठी बसू दिले नाही. वास्तविक जिल्हा प्रशासनाचा आदेशच शेतकर्यांपर्यंत पोहचू शकत नाही, पोहचला तरी ज्या दिवशी ते भाजीपाला विकायला आणतात त्यादिवशी त्यामुळे आदेश जारी करण्याचा वेळही सकाळी किंवा दुपारी असायला हवा अशा भावना हतबल झालेल्या शेतकर्यांतून व्यक्त झाल्या.वैतागलेल्या काही शेतकर्यांनी कवडीमोल दरात टमाटे, कोथिंबीरीची विक्री केली. तर काहींनी भाजीपाला रस्त्यावर टाकुन दिल्याचेही प्रकार घडले.
Leave a comment