बीड । वार्ताहर
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता बीड जिल्हा प्रशासन अधिक सतर्क आहे.पाटोदा तालुक्यात परजिल्ह्यातून काही नागरिक चोरट्या मार्गाने प्रवेश करत आहेत, त्यामुळे कोरोनाचा बीड जिल्ह्यात प्रादुर्भाव नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.15)पाटोदा तहसीलदार यांनी पाटोदा व अंमळनेर पोलिसांना पत्र देत अशा नागरिकांवर कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत.
तहसीलदार यांनी पत्रात नमूद केले आहे, कोरोना आजार पसरू नये यासाठी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र तरीही पाटोदा तालुक्यात बाहेर जिल्ह्यातून नागरिक चोर मार्गाने येतात.या नागरिकांपासून कोरोना विषाणू आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणार्या नागरिकांची नोंद घेण्यासाठी पाटोदा तहसील कार्यालयाने गावनिहाय कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.या कर्मचार्यांनी बाहेर जिल्ह्यातून येणार्या नागरिकांची नावे आपणास कळविल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी व तसा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करावा अशा सूचना तहसीलदार यांनी पाटोदा व अंमळनेर ठाणे प्रमुखांना दिल्या आहेत.
Leave a comment