आष्टी । वार्ताहर
कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या गोरगरिब सुमारे 400 कुटुंबांना रोजच्या वापरातील किराणा सामानाचे वाटप करून कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि कर्मचार्यांनी सामाजिक बांधिलकीतून माणुसकीचे दर्शन घडवले.
कोरोना संसर्गामुळे अचानक उद्भवलेल्या परिस्थितीतून रोजंदारीवर काम करणार्या गोरगरीब मजुरांवर तसेच बाहेर गावावरून कामानिमित्त आलेल्या आणि अचानक लॉकडाऊन ची घोषणा झाल्यामुळे अडकून पडलेल्या लोकांची पंचाईत होऊन बसली. कोरोना संसर्गाच्या धोक्याबरोबरच उपासमारीची वेळ या गरीब लोकांवर आली. माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी- पाटोदा -शिरूर या विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे 11 हजार कुटुंबांना आवश्यक किराणा सामानाचे वाटप केले. हे काम करत असताना कडा गावांमध्ये आणखी काही लोकांना याची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्याने आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच. जी .विधाते यांनी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी यांच्यासमोर आणखी काही लोकांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या या संकल्पनेला सर्व प्राध्यापक व कर्मचार्यांनी प्रतिसाद देऊन कडा आणि परिसरातील सुमारे चारशे कुटुंबांना साखर, शेंगदाणे, हरभराडाळ ,गोडेतेल, चहा पावडर अशा रोजच्या वापरातील किराणा सामानाचे गरजू व्यक्तींची यादी करून घरोघर जाऊन वाटप केले. आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागाने दत्तक घेतलेल्या आनंदवाडी-सराटे वडगाव या गावातील गरजूंना देखील या किराणा सामानाचे किट वाटप करण्यात आले.आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाच्या या उपक्रमावरून त्यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले.या कामी आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.जी. विधाते, उपप्राचार्य डॉ.भगवान वाघुले, भाजप कडा शहराध्यक्ष विनोद ढोबळे, अल्पसंख्यांक आघाडीचे डॉ. मुश्ताक पानसरे, डॉ. बाप्पू खैरे, डॉ.आर.जी. विधाते, डॉ. श्याम सांगळे, अनिल घोडके, डॉ. राम बोडके, डॉ.जी .पी. बोडके व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले होते.
Leave a comment