माजलगाव । वार्ताहर
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लॉकडाऊन काळात अनुयायांनी घराबाहेर न पडता घरातच राहून बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यासाठी शहरातील शेख बाबा, फेरोज इनामदार यांनी एक हजार लोकांच्या घरी जाऊन त्यांना मेणबत्ती, उदबत्ती व फुले वाटप केले. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. त्यावर मात करण्यासाठी लोकांनी घरातच राहावे हा पर्याय आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे.त्यातच 14 एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी घराबाहेर पडतात.मात्र लॉक डाऊन काळात प्रत्येकाने आपल्या घराबाहेर न पडता आरोग्याची काळजी घ्यावी व घरातूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता यावे यासाठी सामाजिक कार्यात सतत सहभागी असणारे शेख बाबा, फेरोज इनामदार व शेख युसूफ,शेख शफिक,सलाउद्दीन, सिकंदर सय्यद यांनी आपल्या मित्रमंडळीच्या माध्यमातून काही उपक्रम राबविता येतो का असा विचार केला व त्यातून मार्ग सुचला.जवळपास दोन पोते शेवंतीची फुले, मेणबत्त्या, उदबत्त्या असा सेट तयार करण्यात आला व शहरातील भीमनगर, अशोकनगर, इंदिरानगर, जयभीम नगर, पंचशीलनगर, गौतमनगर या भागात घराघरांत एक हजार सेट वाटप करण्यात आले.अचानक हे साहित्य घरात मिळाल्यानंतर बौद्ध बांधवांना आनंद गगनात मावेनासा झाला 14 एप्रिल दिवशी आपल्या लाडक्या दैवतास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस घरोघरी मेणबत्ती, उदबत्ती लावून व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तरुणांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
15
Apr
Leave a comment