शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
बीड,दि.14(प्रतिनिधी):-
सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने सगळीकडे थैमान घातले आहे. राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे सर्व कामकाज ठप्प झालेले आहे. येत्या जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष 2020-21 सुरु होत असून खाजगी शाळा, महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. गत 20 दिवसापासून सर्वकाही लॉकडाऊन असल्यामुळे गोरगरीब जनता हैराण झालेली आहे. गोरगरीबांना उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांच्या समोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शैक्षणिक वर्ष सुरु असल्याने आपल्या पाल्यांना शाळेत, महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी पालकांची धावपळ होणार आहे. सर्वसामान्यांची आर्थिक ओढाताण असताना खाजगी शाळा आणि महाविद्यालये आपली प्रवेश शुल्क कमी करावयास तयार नाहीत.या संबंधी प्रशासनाने त्वरीत निर्णय घेवून खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना त्यांचे शुल्क कमी करावयाचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
जिल्हाप्रमुख खांडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना या आजारामुळे राज्यात संचारबंदी तसेच लॉकडाऊन सुरु आहे.सर्वच व्यवहार ठप्प झालेले आहेत. पुढील महिन्यापासून शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरु होणार आहेत. ठिकठिकाणी खाजगी शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पालक आणि पाल्यांची गर्दी होणार आहे. खाजगी शाळा आणि महाविद्यालय दरवर्षी आपल्या प्रवेश शुल्क व इतर शुल्कांमध्ये वाढ करत असते. यंदाही ते शुल्क वाढवू शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक टंचाईचे मोठे संकट कोसळलेले असून गोरगरीबांच्या पाल्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना शुल्क देण्या इतपत सुध्दा पैसे उपलब्ध होवू शकत नाहीत. जर प्रवेशच मिळाला नाही तर या गोरगरीबांच्या पाल्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू शकते. त्यामुळे प्रशासनाने खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना आदेश काढून कमीत कमी शुल्क आकारुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास भाग पाडावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केली आहे.
Leave a comment