गेवराई-अंबाजोगाई । वार्ताहर
कोरोनाची लक्षणे आढळली, म्हणून शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या दोन संशयित रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठवले गेले. मात्र दोघांचेही अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले असतानाही त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.14) पहाटे 1 व सकाळी 9.30 वाजता एकापाठोपाठ दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेसह जिल्हा हादरला आहे. महत्वाचे हे की, यातील एकाचा सारीने तर दुसर्याचा न्युमोनियाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकार्यांनी वर्तवला आहे.
गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथील एक 38 वर्षीय व्यक्ती 5 एप्रिल रोजी तो सीमाबंदी असतानाही छुप्या मार्गाने औरंगाबादहून अहमदनगर जिल्हामार्गे महारटाकळी येथे आला होता. त्यास सर्दी, तास व श्वसनाचा त्रास होत होता. कोरोनाची लक्षणे आढळल्याने शनिवारी (दि.11) रात्री हा संशयित रुग्ण स्वतःहुन गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास बीड जिल्हा रुग्णालयात हलवले,तिथे रविवारी त्या रुग्णाच्या घशातील स्त्रावाचे नमुनेही घेतले गेले होते. त्याचा रिपोर्टही सोमवारी प्राप्त झाला, जो की, कोरोना निगेटिव्ह होता. दरम्यान रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता; संबंधित रुग्णाला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात वैद्यकीय अधिकार्यांच्या निगराणीखाली ठेवलेले होते.असे असतानाच मंगळवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास त्या कोरोना निगेटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला.दरम्यान त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाल हे कळु शकले नाही. त्यामुळे बीड जिल्हा वासियांची चिंता पुन्हा वाढली आहे. सध्या जिल्ह्यात 5 जण विलगीकरण कक्षात मंगळवारपर्यंत जिल्ह्यात एकुण 133 जणांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठवले त्यातील 129 कोरोना निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगीतले.
अंबाजोगाईत ओडिसातील मजुराचा मृत्यू
अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या एका 40 वर्षीय कोरोना संशयिताचा मंगळवारी (दि.14) सकाळी मृत्यू झाला.हा संशयित मूळ ओडिसातील आहे. एक बोअरवेलच्या गाडीवर तो मजुरी करत असे. दोन दिवसांपूर्वी कोरोना सदृश्य लक्षणांमुळे त्याला स्वारातीच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास या रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी दिली. दरम्यान रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अंबाजोगाईकरांचा जीव भांड्यात पडला.
Leave a comment