बीड । वार्ताहर
कोरोनाचा वाढता लक्षात घेवून जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. शिवाय सर्व उद्योग आणि कामेही बंद आहेत. मात्र मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अटी व शर्थीच्या अधिन राहून जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व रेल्वेच्या कामांना सुरूवात करण्याची परवानगी दिली आहे.
या आदेशानुसार, सद्यस्थितीत कार्यक्षेत्रावर कार्यरत मजूरांच्या कॅम्पमध्ये असलेल्या व्यक्तींमार्फतच कामे केली जावीत. कोणीही नवीन मजूर बाहेरून आणण्यास तसेच कॅम्पवरील मजूरांना अथवा कुटूंबियांना कॅम्प साईट सोडून जाण्यास पूर्णत: प्रतिबंध करावा. मजूरांना अन्नधान्य, भाजीपाला, किराणा या व्यवस्था कंत्राटदारांनी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सामाजिक अंतर ठेवून प्रत्येक कामे होत असल्याची खात्री व अभियंत्यांनी करावी व त्यासाठी आवश्यक कार्यपध्दती अवलंबावी. याबरोबरच 40 पेक्षा जास्त कामगार असणार नाहीत याची दक्षता घेतली जावी असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. कार्यक्षेत्रावरील कॅम्पमधील कोणालाही सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तात्काळ आरोग्य विभागात कळवून संबंधीतास रूग्णालयात कंत्राटदाराने न्यावे. मजूरांना व कर्मचार्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शक सुचना त्यांच्या बोली भाषेत अवगत करून द्याव्यात. या अटी शर्थींचे पालन केले जावेत असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
भाजीपाला विक्रेत्यांना परवानगी आवश्यक
बीड शहरामध्ये आजपासून घाऊक भाजीपाला व फळविक्रीस पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात आलेली आहे. शिवाय भाजीपाला व फळविक्रेत्यांना रस्त्यावर बसून फळविक्रीसही मनाई केली गेली आहे. ज्यांना भाजीपाला व फळे विकायची आहेत त्यांनी तालुकास्तरीय समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे.
नवीन बोअरवेल घेता येणार
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शेती व पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने नवीन बोअरवेल घेणे, बोअरवेल दुरूस्ती करणे व यासह वापरण्यात येणारे यंत्र व वाहने यांना अत्यावश्यक बाब म्हणून काम करण्यास मंगळवारी जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.
Leave a comment