बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात चेकपोस्टवर पोलीस कार्यरत आहेत की नाही असा प्रश्न निर्माण होणारी घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे मुंबईवरून तब्बल 13 लोक सोमवारी रात्री आले आहेत. विशेष म्हणजे मुंबई ते शिरूरपर्यंत कोणत्याही चेकपोस्टवर या वाहनातून लोक आणले जात आहेत याकडे लक्ष दिले गेले नाही. मग जिल्ह्यातल्या चेकपोस्टवरील पोलीस काय झोपा काढत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात सर्वत्र जिल्हाबंदी आणि नाकाबंदी आहे. तब्बल चौदा ठिकाणी चेकपोस्ट आहेत. जिल्ह्यातून बाहेर किंवा जिल्ह्यात येण्यास कोणत्याही वाहनास परवानगी नाही आहे. अस असताना सुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक चोर मार्गाने, शेतातून, आडवळणाने दाखल होत आहेत. अशातच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे सोमवारी रात्री 7 महिला अन् 6 पुरुष दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हे सगळे लोक मुंबई येथून गावात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे लोक ज्या वाहनातून आले आहेत त्या वाहनावर अत्यावश्यक सेवा असे स्टिकर असून परवानगी पत्र देखील आहे. ही दोन्ही वाहने गावातीलच असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हे लोक जामखेड, किंवा अमळनेर, किंवा पाथर्डी मार्गे बीड जिल्ह्यात दाखल झाले असतील तर येथे चेकपोस्टवर असणार्या पोलिसांनी गाड्या चेक न करता कशा पुढे पाठवल्या. की काही चिरीमिरी घेऊन सोडल्या हा प्रश्न अनुत्तरित आहे. या दोन्ही गाड्यामधून 13 लोक या अशा काळात जिल्ह्यात दाखल झाले आहेत हे विशेष. एकीकडे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत असताना दुसरीकडे चेकपोस्टवर असणारे पोलीस कर्मचारी जर असा हलगर्जीपणा करणार असतील तर त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a comment