बीड | वार्ताहर
गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथील कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या 'त्या' 38 वर्षीय व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी (दि.14) पहाटे 1 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. आज सकाळी रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली.
शनिवारी (दि.11) रात्री हा संशयित रुग्ण स्वतःहुन गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास बीड जिल्हा रुग्णालयात हलवले, तिथे रविवारी त्या रुग्णाच्या घशातील स्त्रावाचे नमुनेही घेतले गेले होते. त्याचा रिपोर्टही सोमवारी प्राप्त झाला, जो की, कोरोना निगेटिव्ह होता. दरम्यान रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता, संबंधित रुग्णाला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवलेले होते.असे असतानाच आज मंगळवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास त्या कोरोना निगेटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला.त्यामुळे बीडकरांची चिंता पुन्हा वाढली आहे.दरम्यान आज बीडमध्ये 3 तर अंबाजोगाई येथे 1 अशा चार जणांचे स्वँब तपासणीला पाठवले गेले आहेत.
संबंधित रुग्णाला सारी आजाराची तर लागण झाली नव्हती ना? यासाठी त्याचे स्वँब पुणे येथे प्रयोगशाळेत पाठवले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.
Leave a comment