बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणारे सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी (दि.13) संदीप क्षीरसागर यांनी शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांची भेट घेऊन बीड विधानसभा मतदारसंघातील विविध वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली आणि योग्य त्या सूचना देखील केल्या. त्याचबरोबर आगामी काळात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक असणारे सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिले. यावेळी बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे, डीएचओ डॉ.राधाकिशन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आगामी काळात संपूर्ण बीड जिल्ह्याला अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची गरज भासण्याची शक्यता आहे त्याचा अनुषंगाने आपली सर्व वैद्यकीय व्यवस्था सज्ज असणे देखील तितकेच गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेता आमदार संदीप क्षीरसागर यांनी आवश्यक असलेली सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.आ. संदीप क्षीरसागर यांनी डॉ.अशोक थोरात यांची भेट घेऊन आवश्यक असलेल्या सर्व वैद्यकीय उपकरणांची माहिती घेतली त्यानंतर तुम्ही केवळ हाक द्या आम्ही साथ द्यायला सदैव तयार आहोत असं म्हणत आमदार फंडातील निम्म्यापेक्षा जास्त निधी हा वैद्यकीय सुविधांवर खर्च करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व आरोग्य केंद्र अत्याधुनिक करण्यासाठी देखील आ. क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे. जेणे करून कोणत्याही नागरिकाला योग्य त्या इलाजापासून वंचित राहण्याची गरज भासणार नाही.
Leave a comment