पुण्याहून आलेला मजुरांचा टेम्पो माजलगावात पकडला
माजलगाव । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडसह सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत . मात्र अशा स्थितीत पुण्यातील वाघोली येथे रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचे काम करणारे सहा कुटूंबातील 33 जण एका टेम्पोतून परभणी जिल्ह्यात जात होते. बीड जिल्ह्याच्या हद्दीवरील गंगामसला चेकपोस्टवर सोमवारी (दि.13) सकाळी त्यांना पोलीसांनी पकडले. ालक, मालक, क्लीनरवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्व मजुरांची अलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना आहे त्याच ठिकाणी राहून घरात बसण्याचे आवाहन केले आहे. अशा स्थितीत हातावर पोट भरणार्या गरिबांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे ते आपले गाव जवळ करण्यासाठी धडपड करीत आहेत. पिंपरी बु.(ता.सेलू जि.परभणी) येथील सहा कुटुंब मागील 20 दिवसापासून पुणे येथील वाघोली येथे अडकून पडले होते. सर्वजण रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचे काम करीत होते. गुत्तेदाराने लक्ष देत नसल्याने त्यांनी रविवारी (दि.12) रात्री रेशन धान्याची चिठ्ठी लिहिलेल्या एका टेम्पोतून (एमएच. 25 यु 192) मुलाबाळासह गावाकडे प्रवास सुरु केला. पुणे,नगर जिल्ह्याच्या हद्दी चुकवीत सोमवारी (दि.13) ते बीड, परभणी जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या गंगामसला चेकपोस्टवर आले. चेकपोस्टवर असणारे सपोनि.श्रीमती माने, आरोग्य कर्मचारी शेख अतीक अली, मंडळकृषी अधिकारी वाघमोडे तानाजी, पोकॉ.पुजारी यांना संशय आल्याने टेम्पोची तपासणी केली. यावेळी टेम्पोत मजूर असल्याचे आढळून आले. यामुळे पोलीसांनी टेम्पो ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील तिघांवर गुन्हा दाखल केला असून सर्व मजुरांची माऊली लॉन्स येथील अलगीकरण कक्षात रवानगी केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले यांनी दिली.
Leave a comment