जे नियम पाळतात ते चुकतात का?
न.प.,पोलिस प्रशासनाने सर्वच दुर्लक्षीत केलंय का?
बीड । वार्ताहर
येत्या 30 सप्टेंबरपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनलॉक 4 अंतर्गत लॉकडाऊन नियम लागु केले आहेत. तेच नियम जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात लागु केले आहेत. 1 सप्टेंबरपासून हे नियम लागु झाले. सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत सर्व व्यापारपेठ सुरू ठेवायची मात्र 6.30 नंतर सर्व दुकाने बंद करायची. असा नियम असतानाही बीडमध्ये काही भागातील दुकाने 6.30 वाजता बंद होतात मात्र बहुतांश दुकाने रात्री 8.30, 9 नंतरही चालु असतात. मग जे नियम पाळतात आणि 6.30 ला आपली दुकाने बंद करतात. त्यांचे कुठे चुकते का? असा प्रश्न नियम पाळणार्या दुकानदारांना पडला आहे. या सर्व नियमांचे अमलबजावणी करणार्या नगर पालिका आणि पोलिस प्रशासनाने याकडे सर्वच बाबतीत दुर्लक्ष केले आहे. ते का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. नियम पाळणार्यांना त्रास होतो मग नियम न पाळणार्यांना प्रशासनाकडून काही त्रास होत नाही. त्यामुळे नियम पाळायचे तरी कशासाठी? असा सुर नियम पाळणार्यांमधून होत आहे. जे वेळेबाबत होत आहे तेच सोशल डिस्टन्स आणि मास्कच्या बाबतीतही घडत आहे. रस्त्यावर भाजीपाला विकणारे, फळे विकणारे याशिवाय विविध वस्तूची विक्री करणार्या एकाही विक्रेत्याच्या तोंडावर मास्क नसतो. भाजीपाला विक्रेते तर शहरातील विविध भागामध्ये रात्री 9.30 नंतरही बसलेले असतात. यावर नियंत्रण कोणाचे? असा प्रश्नही निर्माण होवू लागला आहे. प्रशासन तरी कुठे कुठे लक्ष देणार? ही देखील दुसरी बाजु आहे. कोरोना वाढत आहे तो कशामुळे? याचे वेगळे उत्तर देण्याची आता गरज आहे का? व्यापार्यांनीच काळजी घेणे गरजेचे होवून बसले आहे.
जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वकाही सुरू होईल अशी चर्चा होती. मात्र राज्याने परत 31 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊनचे नियम लागु केले. यामध्ये हॉटेल, धाबे, मंदिर, शाळा, पान टपर्या, दारूची दुकाने बंदच ठेवली. इतर दुकाने उघडी करण्यास परवानगी दिली. मात्र त्यामध्येही काही नियम घालून दिली होती. या नियमांमध्ये सर्वात महत्वाचे सॅनिटायझेशन त्यानंतर मास्कचे बंधन आणि त्यानंतर सोशल डिस्टन्स असे काही नियम होते. बीड शहरातील सुभाष रोडवरील कोणत्याही मोठ्या कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर ना सॅनिटायझेशन होते, ना मालकाला मास्क असतो ना नौकरांना मास्क असतो. सुभाष रोडच काय...शहरातील सर्वच दुकानांमध्ये हेच चित्र आहे. मोंढ्यात तर कोरोनाचा संसर्ग आहे किंवा नाही अशा परिस्थितीत व्यापारी वागत आहेत. ग्रामीण भागातून येणारे वाहनचालक लहान लहान दुकानदार यांना कशाचेही सोयर सुतक नाही. हे कुठलाही नियम पाळत नाहीत. लॉकडाऊन सुरू असल्याने संध्याकाळी 6.30 वाजता सर्व दुकाने बंद करायची असा नियम घालून दिला आहे. मात्र हा नियम केवळ सुभाष रोड, धोंडीपुरा, नगर रोड, सहयोग नगर भाग, बार्शी रोड, जालना रोडवरील काही भाग आदि भागातच पाळला जातो. इतरत्र गल्लीबोळात असलेले कारंजावरील हॉटेल, पानटपर्या, दुकाने त्यानंतर हिरालाल चौकातील दुकाने, मोंढा रोडवरील दुकाने रात्री उशिरापर्यंत चालु असतात. त्यांना लॉकडाऊनचे नियम लागु आहेत का नाही? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. जुने बीड म्हणून ओळखल्या जाणार्या पेठ बीडमध्ये बार्शी नाका परिसरात शाहुनगर परिसरामध्ये किंवा डिपी रोड भागात गेले तर सर्व काही बिंधास्तपणे सुरू असते. असे का? असा प्रश्न नियम पाळणारे विचारत आहेत. सुरूवातीला पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या. आता गाड्याही फिरत नाहीत. पोलिसही बीडच्या लोकांना सांगुन सांगुन थकले आहेत. नगरपालिका प्रशासनही कंटाळले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रशासनाने सर्वच बाबतीत दुर्लक्ष केले आहे. परंतू असे करून चालणार आहे का? लोकांना धाक हवा असतो. तो धाक लावणे गरजेचे आहे. नियम तोडण्यामध्ये मोठेपणा वाटणार्या लोकांची बीडमध्ये संख्या मोठी आहे. अशा लोकांना थोडा धाक लावणे आवश्यक आहे. मास्क वापरणे प्रत्येक दुकानात सॅनिटायची व्यवस्था करणे आणि लॉकडाऊनची नियम पाळणे हे खरे तर व्यापार्यांनीच स्वत:च करायला हवे पण ते करत नाहीत. अलीकडे सहयोग नगर डिपी रोड, जालना रोड, शाहुनगर भागातील रस्त्यावर, बार्शी नाका भागातील काही रस्त्यावर, नगर रोड, कारंजी परिसरात भाजी विक्रेते बसतात. सकाळी 8 वाजलेपासून तर रात्री 9, 9.30 पर्यंत हे भाजीविक्रेते जाग्यावरच असतात. त्यांना ना मास्क नसतो, ना सॅनिटायजेशनची व्यवस्था अशा लोकांकडून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाही का? याचा सारासार विचार केला तर पोलिसांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. थोडाफार धाक लावणे आवश्यक आहे. नाही आरोग्य प्रशासनाने कितीही रॅपिड अॅन्टीजेन घेतल्या तरी कोरोना संसर्गाचे लोक संपणार नाहीत. याकडे जिल्हाधिकार्यांनी देखील लक्ष देणे गरजेचे आहे. ते वारंवार आवाहन करीत आहेत. मात्र त्यांच्या आवाहनाकडे बीडकर किती गांभिर्याने पाहतात? हेही तपासणे गरजेचे आहे. बीडकरांना मोकळे सोडले तर काय करू शकतात? हे अनुभवले आहे. त्यामुळे एवढेही मोकळे सोडणे नियम पाळणार्यांना धोकदायक ठरू शकते. काळजी घेणार्यांना धोका निर्माण होवू शकतो. रात्री उशिरापर्यंत भाजी विकण्याचे काय कारण? किंवा दुकान चालु ठेवण्याचे कारण काय? याकडे नगरपालिका, पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
Leave a comment