मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश
जालना । वार्ताहर
जालना शहरामध्ये असलेल्या विवेकानंद हॉस्पीटलने शासनाने ठरवुन दिलेल्या दरांपेक्षा अधिकची रक्कम रुग्णांकडून घेतल्याचे देयकाच्या परिक्षणामध्ये आढळुन आले. रुग्णांकडून घेतलेली 1 लाख 93 हजार 986 एवढी अधिकची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.
जालना जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात विविध उपचारांसाठी जातात. कोरोना या महामारीच्या काळामध्ये डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटलमध्येसुद्धा रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना योग्य उपचार व योजनेच्या लाभाची अंमलबजावणी व्यवस्थीत होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील 11 रुग्णांलयामध्ये जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तपासणी पथकाची स्थापना केलेली आहे. विवेकानंद हॉस्पीटलमध्ये रुग्णांकडून बीलाची अतिरिक्त रक्कम घेतली जात असल्याची तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तपासणी पथकाने बीलांची तपासणी केली असता रुग्णालयाने अतिरिक्त रक्कम आकारल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी तातडीने आदेश पारित करत अतिरिक्त रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्याचा ईशाराही दिला आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment