माजलगाव :
शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याबाबत पणन महासंघाला निर्देश देण्यात यावे, अशी मागणी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पणन महासंघ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याविषयावर त्यांनी निवेदन दिले आहे.
‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परिणामी खासगी आणि शासकीय कापूस खरेदी ठप्प झाली आहे. यावर्षी पावसाची संततधार असल्याने दरवर्षीपेक्षा उशीरानेचे कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला. हा कापूस कित्येक शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यातच खरेदी बंद झाली. परिणामी खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या पैशाची सोय कशी करावी, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. कापूस वेचणीचे पैसे देण्यासाठी देखील त्यांच्याकडे रक्कम नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे १३ मार्चपर्यंत कार्यक्षेत्रातील ४१९६ शेतकऱ्यांनी आवश्यकत्या कागदपत्रांसह नोंदी केलेल्या असून त्यातील केवळ १८९ शेतकऱ्यांच्या कापसाची वजन मापे झालेली असून उर्वरित ४००७ शेतकऱ्यांकडील अंदाजे १ लाख ९०हजार क्विंटल कापूस खरेदी करणे बाकी आहे. या बाजार समिती कार्यक्षेत्रातील कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर ठेवून गर्दी होणार नाही याची दखल घेतली जाईल, प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधूनच केंद्रावर प्रवेश दिला जाईल तसेच हात धूण्यासाठी पाणी, हॅन्डवाॅश इ. आवश्यक त्या सोयीसुविधा बाजार समिती मार्फत करण्यात येईल. ही सारी परिस्थिती लक्षात घेता शासनाने कापूस खरेदीबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे दि.११ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली. खरेदीबाबत यंत्रणेला तात्काळ निर्देश देण्यात यावे, असेही सभापती अशोक डक यांनी निवेदनात म्हटले आहे.
Leave a comment