आतापर्यंत 118 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
राज्यातील महानगरांमध्ये कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. बीड जिल्ह्यात सुदैवाने अजुनही ही स्थिती नियंत्रणात आहे. आष्टी तालुक्यातील एका रुग्णाचा अपवाद वगळता कोणीही कुठेही रुग्ण सापडलेला नाही. दरम्यान शनिवारी (दि.11) सकाळी बीड जिल्ह्यातून 8 तर रविवारी गेवराई तालुक्यातील 1 अशा एकुण 9 जणांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.आज सोमवारी ते रिपोेर्ट प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
बीड जिल्ह्यात रविवार (दि.12)पर्यंत एकुण 126 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 118 संशयितांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील 92 तर अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या 26 जणांचा समावेश आहे. दरम्यान शनिवारी जिल्हा रुग्णालयात नव्याने 2 तर अंबाजोगाईत 5 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे तर एकुण 8 जणांच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. यात रविवारी गेवराई तालुक्यातील एक रुग्ण दाखल झाला. त्याचे स्वॅबही तपासणीसाठी पाठवण्यात आल्याने आता बीड जिल्ह्यातील एकुण 9 रुग्णांच्या स्वॅब रिपोर्टकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आज सोमवारी हे रिपोर्ट प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
गेवराई तालुक्यातील संशयिताचे नमुनेही प्रयोगशाळेत
गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथे कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण शनिवारी (दि.11) रात्री गेवराई उपजिल्हा रुग्णालयात स्वतः हजर झाला. त्याच्यामध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आल्यामुळे त्याला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या संशयिताच्या संपर्कात आलेल्या महारटाकळी व बोधेगाव येथील जवळपास 42 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान तो रुग्ण गेल्या काही महिन्यापासून ओरंगाबाद येथे रहात होता.तो लॉकडाऊनमुळे आपल्या गावी आला होता.
चकलंबा गावात येणार्या सीमा केल्या बंद
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून चकलांबा गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या. तसेच बोधेगाव रोड,मातोरी रोड,बालमटाकळी रोड,तिंतरवणी रोड,या चारही रस्ते बंद करण्यात आले आहे.संरपच सुरेश जाजु,ग्रामविकास अधिकारी सरग यांच्या पुढाकाराने पोलीस प्रशासन मदत म्हणुन चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे.यामध्ये स्थानिक 15 युवकांचा सहभाग आहे.या सर्व सीमेवर ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवत आहेत.
Leave a comment