केज वासीयांच्या अभूतपूर्व स्वागताने पोलीस भारावले
केज । वार्ताहर
आपल्या स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता सीमेवर ज्याप्रमाणे देशाचे सैनिक तळतावर शीर घेऊन लढत असतात त्याच प्रमाणे जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना विषाणूशी लढणार्या डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आणि महसूल व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारर्याप्रति संवेदना आणि आदर व्यक्त करून केज वाशियांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉक डाऊन अंतर्गत संचारबंदी आहे. त्यासाठी केज येथे पोलीस, माजी सैनिक आणि त्यांना साहाय्य करणार्या गृहरक्षक दल, आपत्ती निवारण दल यांचे केज शहरातुन पथ संचलन करण्यात आले. केज शहरातील शिवाजी चौक, कानडी रोड, वकिलवाडी, समर्थनगर, मंगळवार पेठ, आंबेडकर चौक, रोजा मोहल्ला, फुले नगर, या मार्गवर पथ संचालन करण्यात आले यावेळी पोलीस, गृरक्षक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि आरोग्य विभाग, महसूल अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे स्वतःची किंवा आपल्या कुटुंबाची काळजी न करता स्वतःच्या जीविताची तमा न बाळगता कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे आज केज वासीयांनी पथ संचलन करण्यात येणार्या मार्गावर रांगोळ्या काढुन कोरोना विषयी जनजागृती व आरोग्य आणि पोलीस, आरोग्य यांच्या बाबतचे संदेश देणारे घोषवाक्य लिहिले आणि पथ संचलन करणार्या मार्गावरून आपापल्या घरावरून आणि समोर उभे राहून जाणार्या जवानांवर पुष्पवृष्टी केली. यामुळे वातावरणात एक वेगळाच जोश आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी रमेश आडसकर, हरूनभाई इनामदार, सिताताई बनसोड, कपिल मस्के, अशोक गायकवाड, लखन हजारे आणि प्रतिष्ठित नागरिक यांनी पोलीस अधिकार्यांचा सत्कार केला. केजकरांचे प्रेम पाहून पोलीस अधिकारी आणि सर्वजण भारावून गेले आणि नागरिकही सुद्धा अवाक झालेले दिसले.या पथसंचलनात माजी सैनिकही सहभागी झाले होते आणि वेळ पडल्यास मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a comment