कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्य वाटपातून
राज्य शासनाचा सर्वसामान्यांना दिलासा
मंगळवारपासून होणार वितरण
बीड, दि. 12, (जि. मा. का) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत. त्यापैकी स्थलांतरितांसाठी जिल्हा प्रशासनाने निवारा शेड व भोजनव्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे नियमित आणि मोफत धान्य वाटपाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील म्हणाले, सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, एपीएल केशरी शेतकरी आणि केशरी शिधापत्रिकांसाठी धान्य वितरण केले जाते. त्याचबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मोफत धान्यही वितरण होणार आहे. बीड जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांना माहे एप्रिल 2020 महिन्याचे अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे धान्य पोहोच झाले आहे. एपीएल केशरी शेतकरी या योजनेचे धान्य दि. 13 एप्रिलपर्यंत सर्व रास्त भाव दुकानांमध्ये पोहोच होणार आहे. दि. 14 एप्रिलपासून लाभार्थ्यांना वाटप करण्यास सुरुवात होईल. याचबरोबर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतून 3 महिने मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.
असे होणार धान्य वितरण
अंत्योदय अन्न योजने मध्ये लाभार्थ्यांना दरमहा प्रति कार्ड 23 किलो गहु व 12 किलो तांदुळ असे एकूण 35 किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये 2 रुपये प्रति किलोप्रमाणे गहु व 3 रुपये प्रति किलोप्रमाणे तांदुळ असा दर राहणार आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने मध्ये व एपीएल केशरी शेतकरी लाभार्थी योजने मध्ये दरमहा प्रति सदस्य 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ असे एकूण 5 किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये 2 रुपये किलोप्रमाणे गहु व 3 रुपये किलोप्रमाणे तांदुळ असा दर राहणार आहे.
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये माहे एप्रिल, मे व जून 2020 या प्रत्येक महिन्यासाठी प्रति सदस्य 5 किलो तांदुळ मोफत वाटप करण्यात येणार आहे.
उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना मे व जून 2020 या प्रत्येक महिन्यासाठी प्रति सदस्य 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ असे एकूण 5 किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये गहु 8 रुपये प्रति किलोप्रमाणे व तांदुळ 12 रुपये प्रति किलोप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस धारकांना माहे एप्रिल, मे व जून 2020 दरमहा 1 सिलेंडर याप्रमाणे एकूण 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. गॅस सिलेंडरची किंमत दरमहा गॅस धारकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम खात्यातून काढून गॅस कंपनीला द्यायची आहे.
Leave a comment