बदनापूर । वार्ताहर
तालुक्यातील म्हसला येथे दाभाडीहून जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील प्रशासन व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अर्धवट अवस्थेतील पूल पावसाच्या पाण्याने पूर्णपणे वाहून गेल्यामुळे दाभाडीहून म्हसलासह जवळपास 10 गावांना जाण्यासाठी ग्रामस्थाना मोठी कसरत करावी लागत आहे.
बदनापूर तालुक्यातील म्हसला हे गाव असून या गावाची मुख्य बाजारीपेठ दाभाडी ही आहे. दाभाडीहून या गावासह आजूबाजूच्या दहा ते बारा गावांचे व्यवहार चालत असतात. रूग्णालये, बँका, बियाणे-खते व इतर व्यावसायिक संपर्क दाभाडीशी या गावांचा आहे. दाभाडी म्हसला असा रस्ता आहे. या रस्त्यावरच मेव्हणा या गावाजवळ असलेल्या पुलाचे काम सुरू करण्यात आलेले होते, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदरील ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडलेले होते. नुकत्याच झालेल्या पावसाने हा अर्धवट असलेला पूलही वाहून गेला. त्यामुळे या भागात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. दाभाडीहून म्हसला, खामगाव, तळणी, लोधेवाडी, भातखेडा, राजेवाडी आदी 10 गावांचा संपर्क या रस्त्यानेच असताना बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ऐन पावसाळयात या गावाचा संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हसला पासून दुसरा एक पर्यायी रस्ता असला तरी त्यामुळे जवळपास 5 ते 7 किलोमीटरचा फेरा वाढतो तसेच तो रस्ताही अतिशय खराब असून शेकडो खडडे या रस्त्यावर पडलेले असल्यामुळे वाहतूक करणे दूरापास्त होते. सध्या बि-खतांची आवश्यकता असल्यामुळे शेतकर्यांना रस्ताच नसल्यामुळे शेतकर्यांचेही हाल दिसून येतात. त्याचप्रमाणे या भागातील शेतक्र्यांचेही प्रचंड हाल होत आहे पुलाच्या त्या बाजूला असलेल्या शेतकर्यांचे सध्या शेतीत खते टाकण्याचे काम सुरू असून यासाठी डोक्यावरून खते वाहून न्यावे लागत असल्याचे चित्र असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून या भागातील नागरिकांची व्यथा थांबवण्याची मागणी होत आहे.
Leave a comment