जालना | वार्ताहर
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जालना शहरात 10 दिवस लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना परवानगी असणार आहे.
या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बिनवडे, पोलिस अधीक्षक चैतन्य एस., मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा, पालिकेचे मुख्याधिकारी नार्वेकर यांनी पोलिस पथकांसह काल रोड मार्च करून जनतेला लॉकडाउनचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी औद्योगिक वसाहतीचे क्षेत्र वगळता पूर्ण शहरात 10 दिवस कडक लॉकडाउनचे आदेश दिले आहे.
या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना नियमांसह परवानगी दिली आहे. या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
काल रविवारी रात्री बारा वाजल्यापासून या लॉकडाउनला सुरवात झाली असून १५ जुलैपर्यंत तो कायम राहणार आहे. या काळात शहरातील नागरिकांचे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
दरम्यान परवानगीशिवाय कोणालाही शहरात किंवा शहराबाहेर जाता येणार नाही, नागरिकांना केवळ वैद्यकीय आणि अंत्यविधीसाठी ऑनलाइन प्रवासाची परवानगी मिळणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल व डिझेल देण्यासाठी पंप सुरू राहणार आहे. तर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांना कंपनीच्या ओळखपत्राच्या आधारे परवानगी असणार आहे.
वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा, सर्व शासकीय कार्यालये, शहरातील सर्व बॅंकांचे कार्यालयीन कामकाज (ग्राहकाला बॅंकेत येण्यास प्रतिबंध), जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांना परवानगी राहील आणि फिरत्या दूधविक्रेत्यांना घरपोच दूध विक्रीसाठी सकाळी 7 ते 9:30 पर्यंत परवानगी राहणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्यांना रिकामे जार परत नेता येणार नाही, मोकळ्या भांड्यात पाणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच त्यांच्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. पास असलेल्या वितरकांना घरगुती गॅस सेवा देता येणार आहे. विद्युत, दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्राधारे परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय कर्मचारी व औषधी विक्रेत्यांना दवाखान्याचे ओळखपत्र किंवा ऑनलाइन पासद्वारेच शहराअंतर्गत प्रवासास परवानगी आहे. सर्व प्रकारच्या मालवाहतुकीस व शहराच्या हद्दीतील गोदामे चालवण्यास परवागी राहणार असून हमालांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे.
Leave a comment