गेवराई । वार्ताहर
कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अनधिकृतपणे दवाखान्यात चालवणार्या दोन बोगस डॉक्टर विरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात शनिवार दि.11 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे विठ्ठल गुलाब राठोड (33, रा.लोणाळा), श्रीमंत बाबूलाल मेहता (47 रा.चकलांबा) या दोघांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना ते दवाखाना वैद्यकीय व्यवसाय करत होते. याबाबत आरोग्य विभागाला माहिती मिळाली होती. यावरून शनिवार दिनांक 11 रोजी दुपारी तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, पोलीस निरीक्षक संदीप काळे, डॉ.धनंजय माने, डॉ नोमाणे याचे पथक पाचेगाव येथे गेले.
या पथकाने या दोघांच्या दवाखान्यावर छापा टाकला असता विठ्ठल राठोड व श्रीमंत मेहता हे दोघेही विनापरवाना पाचेगाव येथे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. या पथकाने याचा पंचनामा करून दवाखान्यातील वैद्यकीय साहित्य, मेडिसिन जप्त केले. या प्रकरणी निपाणी जवळका येथील वैद्यकीय अधिकारी धनंजय माने यांच्या फिर्यादीवरून दोन्ही बोगस डॉक्टराविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Leave a comment