मंठा । वार्ताहर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती यापुढे कृषी दिन म्हणून साजरी करण्याबाबत शासनाच्या वतीने अध्यादेश काढण्यात आला आहे. आमदार राजेश राठोड यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून पाठपुरावा केला होता. शासनाने अध्यादेश काढल्यामुळे आ. राठोड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांची जयंती एक जुलै रोजी राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेअंतर्गत कृषी दिन साजरा केला जाणार आहे. सदर अध्यादेशासाठी वनमंत्री संजय राठोड यांनी सहकार्य केल्याचे आमदार राजेश राठोड यांनी सांगितले. वन विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्या वृक्ष लागवड मोहिमेस ‘वसंतराव नाईक वृक्ष लागवड आणि संगोपन अभियान ‘असे नामकरण करून नाईक साहेबांना अपेक्षित हरित महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न व्हावा अशीही मागणी आमदार राठोड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री विश्वजीत कदम, वन मंत्री संजय राठोड यांना पत्राद्वारे केली आहे.
Leave a comment