नगराध्यक्ष, सिओ साहेब पाणीपुरवठ्याचा कालावधी दोन दिवसांनी कमी करायचा सोडून टॅक्स वसुली कसली करता❓ -अमर नाईकवाडे
बीड प्रतिनिधी- कोरोना विषाणु संसर्गाच्या प्रादुर्भावाने व दुष्परिणामाने आज रोजी संपूर्ण जगासह आपला भारत देश आर्थिक परिस्थितीने होरपळत असताना देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री हे देशातील व राज्यातील जनतेला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम करत असताना बीड नगरपरिषद मात्र टॅक्स वसुलीत दंग आहे. नगराध्यक्ष व सिओ साहेब परिस्थितीचं गांभीर्य ओळखून थोडी तरी बीड शहरातील जनतेवर दया दाखवा. शहरातील जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, चौदाव्या वित्त आयोगामार्फत बीड नगर परिषदेला जवळपास 15 कोटींचा निधी येतो, शहरातील स्वच्छतेवर व पाणीपुरवठ्यावर 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्याची तरतूद असताना बळजबरीने करण्यात येणारी वसुली थांबवा असे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे.
कोरोना विरुद्धच्या या युद्धजन्य स्थितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनासह पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत आम्ही आहोत. जिल्हा प्रशासनातील मा.जिल्हाधिकारी, मा.जिल्हा पोलिस अधीक्षक व संपूर्ण आरोग्य यंत्रणा आपले कर्तव्य चोख व प्रामाणिकपणे बजावत असताना बिंदुसरा व माजलगाव धरण पाणीसाठा मुबलक असतानाही बीड नगर परिषदेने पाणीपुरवठ्याचा कालावधी दोन दिवसाने कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, ज्या भागात नाली मिश्रित पाणी येते तेथे तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, शहरातील गल्लीबोळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड फवारणी करावी, धूर फवारणी व जंतुनाशक फवारणी जास्त क्षमतेने व मोठ्या स्वरूपात करावी, शहरात ठीक ठिकाणी झालेले कचऱ्याचे ढिगारे अगोदर साफ करावेत, शहरातील गोळा केलेला कचरा व नाल्यातील काढलेली घाण मोंढा रोडवरील बिंदुसरा नदीपात्रात टाकणे तात्काळ बंद करावे. त्यामुळे बीड नगरपरिषदेने पाणीपट्टी व घरपट्टी च्या नावाखाली रजाकारी वसुली बंद करून शहरातील नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने वरील उपाययोजना तात्काळ कराव्यात व शहरातील नागरिकांना एक वर्षाचा टॅक्स फ्री करावा असे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे.
Leave a comment