बदनापूर । वार्ताहर
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमातून लॉकडाऊन काळात योग दिवसानिमित्त सामूहिक योगा प्रशिक्षण घेणे शक्य नसल्यामुळे एक 20 पानी सचित्र मार्गदर्शक पुस्तिका तयार करून तालुक्यात वाटप करण्यात आली. त्याचप्रमाणे सामाजिक माध्यमातून (सोशल मिडियातून) ही पुस्तिका जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवून योगाकडे त्यांना आकर्षित करण्याचा उपक्रम राबवण्यात आला.
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असून शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत व एमबीए, फार्मसी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांची सोय तालुक्यात या संस्थेने केलेली असताना विविध सामाजिक कार्यक्रमातही या संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर हे हिरीरीने सहभाग नोंदवतात. शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी तालुक्यातील सर्वात मोठा असा कार्यक्रम ते आयोजित करतात. नुकताच कोरोनाचा प्रादूर्भाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्रत्येक गावात घरोघरी जावून डॉ. पाथ्रीकर यांच्या वतीने अर्सेनिक अल्ब्म - 30 या होमिओपॅथीक गोळयांचे वाटप करण्यात आले. दरवर्षी बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्पस मध्ये असलेल्या जिम्नॅशिएन हॉलमध्ये योग दिवसाचे औचित्य साधून प्रशिक्षीत मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनात योग शिक्षण इच्छुकांना दिले जाते. यंदा मात्र लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करताना हा कार्यक्रम घेता न आल्याने संस्थेने एक वीस पानी सचित्र मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली. या पुस्तिकेत सोप्या व सरळ भाषेत सचित्र योग करण्याच्या प्रक्रिया समाजावून सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे विविध योग कसे करावे व ते केल्यानंतर होणारे फायदे विशद केलेले आहेत. ही 20 पानी मार्गदर्शक पुस्तिकेचे विनामुल्य वाटप त्यांनी केले असून याच पुस्तिकेची पीडीएफ कॉपी तयार करून विविध समाज माध्यमाद्वारे (सोशल मिडिया) जास्तीत जास्त तरुणांपर्यंत ही पुस्तिका पोहोचवण्याचे काम करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुढील काळातही क्रीडा व शारीरिक क्षमतेसाठी पाथ्रीकर कॅम्पसमध्ये विविध सोयी-सवलती विनामूल्य देण्यात येतील असे ही डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी सांगितले.
Leave a comment