सरकारने हस्तक्षेप करुन शेतकर्यांना न्याय द्यावा-अॅड.विलासबापू खरात
जालना । वार्ताहर
लेंडी असल्याच्या नावाखाली कापूस खरेदी करण्यास नकार देणार्या ग्रेडरबद्दल पर्यायाने सरकार दोषी धरत शेतकरी वर्ग संतप्त झालेला आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची असून या प्रकरणी सरकारनेच हस्तक्षेप करुन मार्ग काढावा आणि शेतकर्यांचा कापूस तातडीने खरेदी करावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. आमदार अॅड. विलासबापू खरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदनात अॅड. खरात यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे शेतकर्यांना प्रारंभीच्या काळात कापूस विक्री करता आला नाही. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये सुट मिळाली. सरकारने ऑनलाईन पध्दतीने कापूस खरेदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर शेतकर्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन पध्दतीचा अवलब देखील केला. खरे तर पावसाळ्यापूर्वीच शेतकर्यांचा कापूस खरेदी करणे अपेक्षीत होते. मात्र तसे काही झाले नाही. त्यामुळे शेतकर्यांचा कापूस पावसाळा सुरु झाला तरी घरातच पडून आहे. विशेष म्हणजे कापूस विक्री केल्यानंतर येणारा पैसा हा शेतकर्यांना बी- बियाणे, खते, औषधी खरेदीसाठी उपयोगी आला असता मात्र पावसाळा सुरु झाल्यानंतरही कापूस विक्री झालेला नाही. आताही बहुतांशी शेतकरी हे खरेदी केंद्रावर कापूस घेऊन जात असले तरी त्या ठिकाणी त्यांची मोठ्या प्रमाणावर अडवणूक होत आहे. लेंडी असल्याचा कांगावा करुन ग्रेडर मंडळी कापूस घेण्यास नकार देत असल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. काही वेळा तर शेतकरी जो भाव मिळेल त्या भावात कापूस विक्री करत आहेत. लेंडी असल्याचा बाहणा करुन हा कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरच्या मनमानीमुळे अत्यंत कवडीमोल दराने विक्री करावा लागत आहे. शेतकर्यांची ही पिळवणूक थांबली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, याकरीता मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांनीच याप्रकरणी स्वत: लक्ष घालून ग्रेडर मंडळींना योग्य त्या सूचना कराव्यात आणि शेतकर्यांना कापूस ठरलेल्या भावाप्रमाणे खरेदी करावा, अशी मागणीही अॅड. विलासबापू खरात यांनी शेवटी केली आहे.
Leave a comment