जालना । वार्ताहर
जाफराबाद तालुक्यात असलेल्या बुटखेडा येथील शंकर बनकर याने डेहराडून येथील इंडियन मिल्ट्री अॅकॅडमीतील वर्षभराचे लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले असून, तो लष्करात लेफ्टनंन्ट झाला आहे. जाफराबादसारख्या मागास तालुक्यातील युवकाने मारलेली भरारी कौतुकाचा विषय ठरली आहे.
शंकरचे आई वडिल शेतकरी असून साडेचार एकर शेतीवर त्यांची गुजराण चालते. बुटखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. त्यानंतर आठवीसाठी देऊळगावराजा येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. त्याठिकाणी शिकत असताना अपर्णा राजे या शिक्षिकेने त्याला डिस्कव्हरीवरील एनडीए प्रशिक्षणाचा व्हिडिओ दाखविल्यानंतर आपणही लष्करात जावे हा विचार शंकरच्या मनात घर करून बसला. वर्गातील चुणचुणीत आणि हुशार मुलगा अशी त्याची ओळख असल्याने औरंगाबाद येथील एसपीआयने घेतलेल्या लेखी आणि तोंडी परीक्षेत तो उतीर्ण झाला. 2016 मध्ये त्याने एनडीएनची प्रवेश परीक्षा दिली. एनडीएच्या 136 व्या तुकडीचा तो उमेदवार आहे. शंकरची आई सुनीता, वडील उत्तमराव, आजोबा दगडुबा, मामा समाधान म्हस्के , त्याच्या दोन बहिणींनी शंकरने मिळविलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. शंकरची एक बहिण बी. फॉर्मसी, दुसरी अकरावीचे शिक्षण घेत आहे.
कोरोनामुळे आई-वडिलांची अनुपस्थिती
डेहराडून येथे वर्षातून दोन वेळा दीक्षान्त समारंभ आयोजित करण्यात येतो. यंदा शनिवारी (दि. 13) झालेल्या समारंभाला कोरोनामुळे यशस्वी कॅडेंटसचे आई वडिल, कुटुंबीय उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे लष्करी अधिकार्यांनीच कॅडेटसना बॅच लावले. आयएमएच्या इतिहासात पालकांच्या उपस्थितीविना समारंभ होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
Leave a comment