दोन्ही बाधीत बीड तालुक्यातील
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात शुक्रवारी (दि.12) आणखी दोन कोरोना बाधितांची भर पडली आहे. यात बीड तालुक्यातील लोळदगाव येथील 34 वर्षीय तर
बाभूळखुंटा येथील 30 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. अन्य 39 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 3 जणांचे स्वॅब नाकारण्यात आले आहेत.
मागील दोन दिवसात जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठवलेल्या 156 पैकी तब्बल 150 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह व 6 पॉझिटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातून 44 जणांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.सायंकाळी सर्व रिपोर्ट जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून पुन्हा 2 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, हे दोन्ही रुग्ण बीड तालुक्यातील आहेत.
दोन्ही बाधीत क्रेन चालक
बीड शहरातील मसरतनगर व झमझम कॉलनीतील चौघांच्या संपर्कात अनेक लोक आले. या सर्वांचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब घेतले जात आहेत. गुरूवारीही मालकाच्या संपर्कात आलेल्या काही कामगारांचे स्वॅब घेतले होते.
पैकी लोळदगाव व बाभूळखूंटा येथील दोघे पॉझिटिव्ह आले. हे दोघे मालकाच्या संपर्कात आले होते. ते अगोदरच्या रुग्णाकडे क्रेन चालक म्हणून काम करीत होते अशी माहिती समोर आली आहे.मसरतनगर बाधितांशी संबंधित पॉझिटिव्ह आल्याने बीडकरांची चिंता आणखी वाढली आहे.
आता 18 जणांवर उपचार सुरू
बीड जिल्ह्यात गत तीन दिवसात एकूण 8 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या बीड जिल्ह्यात पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे.जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 86 झाली असून यापैकी 64 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शिवाय आता 18 जणांवर उपचार सुरू आहेत.
Leave a comment