परळी:कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक व शासकीय प्रयत्न होत असतांना परळी शहरातील अनेक डॉक्टरांकडून त्यांच्या रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षीततेचे कोणत्याही उपाय योजना केल्या जात नसून सॅनिटायझेशन न करणे, रुग्णांमध्ये सोशल डिस्टन्सींग न ठेवणे असे प्रकार घडत आहेत. दरम्यान, डॉक्टरांकडून रुग्णांच्या सुरक्षीततेसाठी उपाय होणे अपेक्षीत असतांना वैद्यकीय सेवाच या शासकीय निर्देशाला केराची टोपली दाखवित असल्याच्या तकारीत परळी आरोग्य मित्रचे अध्यक्ष तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केली आहे. दरम्यान ना.धनंजय मुंडे यांनी डॉक्टरांना दिलेल्या पीपीई किटचाही वापर डॉक्टर करीत नसल्याचे चंदुलाल बियाणी यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी बीड यांना परळी आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी एक निवेदन दिले असून या निवेदनात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाय योजना व सुचनांचे परळीतील खाजगी रुग्णालयात पालन केले जात नसल्याचे म्हटले आहे. अनेक रुग्णालयात रुग्ण एकमेकांच्या जवळ बसतात, तपासणी कक्षात जाण्यापुर्वी रुग्णांचे हात सॅनिटायईज केले जात नाहीत असे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. डॉक्टरांच्या सुरक्षीततेसाठीच ना.धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने पीपीई किटचे प्रत्येकी दोन सेट दिलेले असतांनाही त्याचाही वापर केला जात नसल्याचे प्रस्तूत निवेदनात बियाणी यांनी नमुद केले आहे.
कोरोना आजाराच्या कालावधीत अनेक डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी शुल्क (कन्स्लटींग फिस) वाढविण्यात आली असून केवळ कोरोनाच्या उपाय योजना करावयाच्या आहेत अशी कारणे सांगत शुल्कामध्ये वाढ केल्याचेही चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले. अनेक डॉक्टर्स स्वतः मास्क वापरत असतांनाही रुग्णांना मास्क वापरण्याबाबत सुचना करीत नाहीत. तसेच या कालावधीत रुग्णालयातील अर्धप्रशिक्षीत कर्मचारी हे सुद्धा उपाय योजनांचे पालन करीत नसल्याचे तक्रारी म्हटले आहे.
दरम्यान अनेक खाजगी रुग्णालयात असलेल्या औषधी दुकानात जेनरिकची औषधे प्रिन्ट रेटवर दिली जात असून ही औषधे 70 टक्के स्वस्त असतांनाही औषधी दुकानदार छापील दरानेच त्याची विक्री करीत असल्याचे म्हटले आहे. जिल्हाधिकारी या नात्याने आपण परळी शहरातील सर्व डॉक्टरांना स्वतःसह रुग्णांच्या सुरक्षीततेसाठी आवश्यक असलेल्या उपाय योजना अंमलात आणाव्यात असे निर्देश देण्याची विनंती परळी आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले आहे. निवेदनाची प्रत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनाही योग्य कार्यवाहीस्तव देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
Leave a comment