खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना यश
परळी । वार्ताहर
व्यवसायानिमित्त अमेरिकेत गेल्यानंतर अचानक लॉक डाऊन लागू झाल्याने अडकुन पडलेल्या विद्याधर गोरे यांना बीडच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी विशेष मदत केली आणि त्यांच्या परतीच्या प्रवासाला परवानगी मिळाली. डॉ.प्रितमताई देवदुतासारख्या धावुन आल्यामुळेच माझा मायदेशी येण्याचा मार्ग मोकळा झाला अशी भावना गोरे यांनी व्यक्त केली असुन त्यांनी प्रितमताई यांचे आभार व्यक्त केले आहेत. गोरे हे मुळचे अंबाजोगाईचे आहेत.
विद्याधर गोरे, राहणार अंबाजोगाई सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. ते व्यवसायाच्या निमित्ताने 3 मार्च 2020 रोजी अमेरिकेला गेले. व्यवसायिक भेटीनंतर त्यांचे 11 एप्रिल 2020 रोजी भारतात परत येण्याचे नियोजन होते. पण 22 मार्च 2020 रोजी भारतात लॉकडाउन झाल्यामुळे त्यांना अमेरिकेतच अडकून राहावे लागले. दरम्यान 14 एप्रिलला त्यांच्या पत्नी सौ. रश्मि विद्याधर गोरे यांना काही आजारमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भारती व्हावे लागले. त्या दिवशी पासून अमेरिकेत असलेले विद्याधर गोरे यांनी भारतात येण्याचे प्रयत्न सुरू केले. विद्याधर गोरे यांनी अमेरिकेकडून स्वखर्चाने भारतात कुठेही विमानाने येता यावे म्हणून अमेरिकेतील भारतीय दूतावासात प्रयत्न सुरू केले. पण बरेच प्रयत्न करून यश आले नाही. अखेर त्यांनी शेवटचा पर्याय म्हणुन बीडच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्याशी संपर्क साधला. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी अतिशय आत्मियतेने त्यांची चौकशी करून त्यांना धिर दिला. काळजी करू नका असे सांगितले आणि सर्व कागदपत्रे मागवून घेतली. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी तातडीने परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विद्याधर गोरे यांची व्यथा सांगितली. परराष्ट्र मंत्र्यांनी याची दखल घेत संबंधित सर्व अधिकार्यांना सूचना केल्या आणि गोरे यांचा भारतात परतीचा प्रवास सुकर केला. दरम्यान विद्याधर गोरे यांनी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी ऐनवेळी अतिशय मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यामुळेच माझा परतीचा प्रवास शक्य झाला असे सांगून त्यांनी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
Leave a comment