बीड । वार्ताहर
सलून दुकानात येणार्या ग्राहकांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य शासनाने केल्या आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे उद्या 1 जूनपासून राज्यासह बीड जिल्ह्यात केस कापण्याच्या व दाढीच्या दरात वाढ केली जाणार असल्याची माहिती वीर जिवा महाले प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र नाभिक आरक्षण समिती प्रदेश कार्याध्यक्ष किशोर गाडेकर आणि नाभीक दुकान मालक संघटनेचे बीड शहराध्यक्ष सुनिल दोडके यांनी दिली आहे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सलूनमध्ये येणार्या ग्राहकाला कोरोनाची बाधा होऊ नये, सलूनमधील कारागिराला बाधा होऊ नये. यासाठी सलूनमध्ये वापरले जाणारे सर्व साहित्य निर्जंतुकीकरण करून वापरावे लागणार आहेत. तसेच ग्राहकाला सलुनमध्ये आल्यावर हात हॅन्डवॉशने स्वच्छ करावे लागणार आहेत. यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जाणार आहे. दाढी करताना प्रत्येक ग्राहकाला नवीन नॅपकीन, केस कापताना प्रत्येकवेळी वेगळी चादर वापरली जाणार आहे. या सर्व सुविधा द्यायच्या असल्याने नाभिक समाज बांधवांचा मोठा खर्च होणार आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर महागाई, आणि सुरक्षितेसाठी होणारा खर्च याचा सारासार विचार करून राज्यासह बीड जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज बांधवांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना केस कापण्यासाठी 100 रुपये , दाढी करण्यासाठी 50 तर स्पेशल दाढी करण्यासाठी 60 रुपये या प्रमाणे दर आकारले जातील. सदरील दरवाढ ही उद्या सोमवार दि.1 जून पासून लागू करण्यात येणार आहे.केस कापणार्या कारागिरांनीही सुरक्षेची साधने वापरणे आवश्यक आहे. यामध्ये स्वत:साठी मास्क, हँडग्लोज, चेहर्यासाठी ग्लास कॅप, ड्रेसकोड वापरावा लागणार आहे.
ग्राहकांनाही घ्यावी लागणार काळजी
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आता सलूनमध्ये जाणार्या ग्राहकांनाही काळजी घ्यावी लागणार आहे. शासन निर्णयानुसार सलून मध्ये येताना प्रत्येक ग्राहकाला दाढी साठी स्वतःचा टॉवेल आणि केस कापण्यासाठी स्वतः चा कापडा आणावा लागणार आहे. त्यामुळे उद्यापासून दाढी आणि केस कापण्यासाठी येणार्या ग्राहकांनी स्वतःचा टॉवेल आणि कपडा आणावा.
Leave a comment