वॉशिंग्टन: 'आम्ही भारताकडून हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या २.९ कोटी डोस खरेदी केले आहेत,' अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. या औषधांचा पुरवठा केल्याबद्दल ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून, 'ते ग्रेट आहेत,' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प आणि मोदी यांचे गेल्या आठवड्यात फोनवरून बोलणे झाले होते. हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील बंदी उठवावी, अशी विनंती ट्रम्प यांनी त्या वेळी केली होती.
या संदर्भात फॉक्स न्यूजचे प्रतिनिधी सीन हॅनिटी यांना दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, 'मी लक्षावधी डोस खरेदी केले आहेत. २.९ कोटी डोसपेक्षाही अधिक. मी पंतप्रधान मोदींशी बोललो आहे. खूप सारे (हायड्रॉक्सिक्लोरोक्विन) भारतातून येत आहे. तुम्ही ते पाठवणार का, असे मी त्यांना विचारले. ते ग्रेट आहेत. ते खरेच चांगले आहेत. ही औषधे त्यांना भारतासाठी राखून ठेवायची होती. त्यामुळे त्यांनी निर्यातीवर बंदी घातली होती.'
मंगळवार रात्रीपर्यंत अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या चार लाखांवर पोहोचली आहे. तेथील बळींची संख्याही १२,८५० झाली आहे. अमेरिकेतील अन्न आणि औषध विभागाने हायड्रॉक्सिक्लोरोक्विनला कोव्हिड १९वरील संभाव्य औषध म्हणून मान्यता दिली आहे. अजूनही तेथे रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. भारताने मंगळवारी अमेरिकेसह अन्य देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची निर्यात करण्यास मंजुरी दिली.
Leave a comment