आष्टी । वार्ताहर
गेली अडीच महिने लॉकडाऊनमुळे कड्यात अडकून पडलेल्या परराज्यातील एका जडी बुटी विक्रेत्याच्या कुटुंबातील वृद्धाचा मृत्यू झाला . त्याच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक ती सगळी मदत करून कड्यातील सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी माणुसकीचे आगळे उदाहरण समोर ठेवले.
रस्त्याच्या कडेला पाल ठोकून जडी बुटी विक्री करणारी परराज्यातील काही कुटुंबे कड्यात वास्तव्याला आहेत.टाळेबंदीमुळे त्यांना अडीच महिन्यांपासून अडकून पडावे लागले आहे.त्यातच उदरनिर्वाहाचा पर्याय नसल्याने अडचणीत भर पडली.कडा गावाच्या सरपंच दीपमाला ढोबळे आणि त्यांचे पती अनिल ढोबळे यांनी त्यांना किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची वेळोवेळी मदत केली.शनिवारी या कुटुंबातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. आधीच खाण्यापिण्याचा प्रश्नसमोर असताना हे एक संकट उभे राहिले. अंत्यसंस्कार कुठे करायचा आणि त्याचा खर्च याचा प्रश्न होता. त्यांनी अनिल ढोबळे यांना ही अडचण सांगितली. ढोबळे यांनी स्मशानभूमीपर्यंत प्रेत नेण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले. अंत्यसंस्कार साठी आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या आणि त्यांना धीर ही दिला. अनिल अष्टेकर, सर्जेराव करांडे, महाडिक यांनी ही यासाठी पुढाकार घेतला.
Leave a comment