अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मोबाईल स्वीकारण्याची जबरदस्ती
अंबाजोगाई | वार्ताहर
अल्पवयीन मुलीचा तरुणाने पाठलाग करून जबरस्तीने तिला मोबाईल फोन स्वीकारण्यास भाग पडले. मुलीच्या आईने याच जाब विचारला असता त्या तरुणाने दोन भावांच्या साह्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून तिघांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
या घटनेतील पीडित मुलगी १६ वर्षांची असून नुकतीच तिने दहावीची परीक्षा दिलेली आहे.शुक्रवारी दुपारी तिची आई माळवे विकण्यासाठी अंबाजोगाईला गेली होती. पीडिता घरी एकटीच असल्याची संधी साधून दुपारी २ वाजताच्या सुमारास आश्रुबा बाळासाहेब केंद्रे हा तरुण तिच्या घराच्या अंगणात आला.भावाला जीवे मारण्याची धमकी देत त्याने जबरदस्तीने पिडीतेला मोबाईल फोन स्वीकारण्यास भाग पाडले आणि निघून गेला.सायंकाळी ५ वाजता आई परतल्यावर पिडीतेने तिला झालेली घटना सांगितली आणि आश्रुबा अनेक दिवसापासून शाळेत जाताना पाठलाग करत असल्याचेही सांगितले. त्यानंतर पीडिता आणि तिची आईने आश्रुबाचे घर गाठले आणि झालेल्या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्याच वेळी आश्रुबाचे भाऊ महेश आबुराव केंद्रे आणि आत्माराम बाबुराव केंद्रे हे तिथे आले आणि त्यांनी पिडीतेच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.यावेळी सरपंच आणि इतर ग्रामस्थांनी जमा होत भांडण सोडविले असे पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपींवर विनयभंग,पोक्सो आणि मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment