किल्लेधारूर । वार्ताहर
शासकीय कापुस खरेदी बाबत शासनाच्या आदेशाचे भंग केल्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या सुचनेनुसार कापुस खरेदीचे टोकन वाटपाचे अधिकार कृषि उत्पन्न बाजार समितीकडून काढण्यात आले असून यापुढे सदरील अधिकार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धारुर यांना हे अधिकार देण्यात आले असल्याचे आदेश दि.29 रोजी जिल्हा उपनिबंधक शिवाजि बडे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील कापुस खरेदीसाठी प्राथमिक नोंदणी पध्दतीचा वापर करण्यात येत आहे. नोंदणी प्रमाणे अनुक्रमांकानूसार शेतकर्यांना मेसेज देवून खरेदी करण्यात येत आहे. वडवणी कृषि उत्पन्न बाजार समितीकडे 2190 कापुस उत्पादक शेतकर्यांनी नोंदणी केलेली आहे. परंतू वडवणी तालुक्यातील जिनिंग मजूर व पाण्या अभावी बंद आहेत. यामुळे धारुर कृषि उत्पन्न बाजार समितीस भोपा येथील लक्ष्मी व्यंकटेश जिनिंगवर वडवणी तालुक्यातील कापुस खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते. मात्र धारुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी टाळाटाळ करुन नकार दर्शवला. सदरील कृती ही शासनाच्या आदेशाचे भंग करणारा असल्याने कापुस खरेदीचे टोकन देण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. यापुढे टोकनचे अधिकार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था धारुर यांना देण्यात आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांनी आदेशात म्हटले आहे.
Leave a comment