बीड । वार्ताहर
कोरोनामुक्त झालेल्या आणखी दोघांना आज शनिवारी (दि.30) सायंकाळी रुग्णालयातून सुटी मिळणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ही माहिती दिली.
कोरोनामुक्त झालेले दोघे केज तालुक्यातील चंदनसावरगाव आणि केळगावचे राहिवासी आहेत. यात 23 वर्षिय तरुण तर 29 वर्षिय महिलेचा समावेश आहे. 19 मे रोजी त्यांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर दोघांवरही डॉक्टरांच्या निगराणीखाली पहिला एक आठवडा बीड जिल्हा रुग्णालयात तर नंतर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार झाले.त्यांना कुठलीही लक्षणे नसल्याने आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दहा दिवस उपचार केल्यानंतर सुटी दिली जात आहे असेही डॉ. थोरात यांनी सांगीतले.
यापुर्वी बुधवारी ईटकूर (ता.गेवराई) येथील बारा वर्षिय मुलगी व हिवरा (ता.माजलगाव) येथील 29 वर्षिय तरुणाला कोरोनाशी यशस्वी लढा देत रुग्णालयातून सुटी मिळाली आहे.सर्व वैद्यकीय अधिकारी,कर्मचार्यांनी पोलीस बँन्डची धून आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना निरोप दिला. त्यानंतर शुक्रवारी कवडगाव थडी (ता.माजलगाव) येथील एकाच कुटुंबातील 18 वर्षिय मुलगी आणि 65 वर्षिय वृद्ध असे दोन जण कोरोनामुक्त झाले. 18 मे रोजी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आणखी दोघांना आज सायंकाळी रुग्णालयातून सुटी मिळणार आहे. जिल्ह्यात आता कोरोनामुक्त झालेल्या एकुण रुग्णांची संख्या 7 वर पोहचली आहे. यापूर्वी पिंपळा (ता.आष्टी) येथील एक रुग्ण नगर येथे उपचार घेवून कोरोनामुक्त झालेला आहे. रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा व त्यांची सर्व टिम परिश्रम घेत आहे.
तालुकानिहाय कोरोनामुक्त
--------------
गेवराई-1
माजलगाव-3
आष्टी-1
केज-2
एकुण 7
--------------
Leave a comment