बीड । वार्ताहर
जिल्ह्यातून शुक्रवारी पाठवलेल्या 118 पैकी तब्बल 116 जणांचे स्वॅब रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशाासनानेही दोन दिवसांपूर्वी लागू केलेला संचारबंदीचा निर्णय रद्द केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी (दि.30) पहाटे सुधारित आदेश जारी केले. त्यानुसार बीड शहरासह 12 गावातील संचारंबदी रद्द करण्यात आली आहे. दरूम्यान कंटेनमेंट झोनमधील संचारबंदी कायम ठेवली गेली आहे. शहरातील सर्व दुकाने सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत सुरु राहतील असेही आदेशात नमूद केले आहे.
जिल्हा प्रशासनाने 27 मे रोजी बीड शहरासह 12 गावामध्ये 4 जूनपर्यंत पर्ण संचारबंदी लागू केली होती. कारेगाव (ता.पाटोदा) येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा संपर्क बीड शहरातील दोन मोठ्या रुग्णालयांसह इतर लोकांशी आल्याने हा आदेश जारी केला गेला होता. परंतु शुक्रवारी शहरातील या दोन्ही रुग्णालया संबंधित व्यक्ती आणि संपर्कातील अन्य व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. नंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी पहाटे सुधारित आदेश जारी केले. त्यानुसार आता 30 मे पासून शहरातील बाजारपेठ दिनांक 25 मे रोजीच्या आदेशानुसार म्हणजेच सकाळी 7. 30 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. बीड तालुक्यातील खंडाळा, चर्हाटा पालवण व ईट, पाटोदा तालूक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालुक्यातील खांडवी,मादळमोही व धारवंटा, केज तालुक्यातील खरमाटा व धारुर तालुक्यातील पारगांव येथील प्रतिबंधात्मक आदेश शिधील करण्याल आले आहेत. त्यामुळे तेथील व्यवहारही पूर्वीप्रमाणे सुरू होतील. बीडमधील मोमीनपुरा-अशोकनगर, जयभवानीनगर,सावतामाळी चौक, संभाजीनगर, बालेपीर येथील परिसरात प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. 28 मे रोजीचे किराणा सेवा घरपोहच, बँका बाबत व अत्यावश्यक सेवेवाबत काढलेले फिरते दुध विक्रेते, जार वाटर सप्लायर्स इ. बाबतचे तीनही आदेश रद्द करण्यात येत आहेत.
बालेपीरमधील चार जण धारुरच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात
बीड शहरातील रोशनपूरा, गल्ली क्र.1 बालेपीर येथील चार व्यक्ती धारुरच्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराच्या इतर पसिरात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये असा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी सादर केल्यानंतर आता जिल्हाधिकारी यांनी या परिसरातील डॉ. सुहास देशपांडे यांच्या घरापासून ते युसुफभाई ड्रायव्हर यांच्या घरापर्यंतच्या परिसरामध्ये कंटेटमेन्ट झोन लागू केला आहे.पुढील अनिश्चीत कालावधीसाठी हा परिसर पूर्णवेळ बंद करुन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून नव्याने 38 व्यक्तींचे स्वॅब तपासणीला
शुक्रवारी बीड जिल्ह्यातून 118 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब लातूरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी 116 अहवाल निगेटिव्ह आले असून 1 पॉझिटिव्ह तर 1 अहवाल अनिर्णयीत आहे. दरम्यान आज शनिवारी (दि.30) सकाळी जिल्ह्यातून एकुण 38 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून 33 तर परळीतून 5 जणांच्या स्वॅबचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या 55 बाधित रुग्णांची नोंद असून कोरोनामुक्त झालेल्या 5 जणांना सुटी देण्यात आली आहे. 50 जणांवर उपचार सुुरु आहेत. यातील 32 जण बीड कोव्हीड हॉस्पीटल तर 2 जण परळी कोव्हीड हेल्थ सेंटर व 13 जणांवर माजलगावच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. यात 4 रुग्ण जोखमीचे आहेत. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.
Leave a comment