जिल्हा प्रशासनाच्या विरोधात शिक्षक संघटना संतापल्या; पालकमंत्र्याकडे तक्रार
बीड । वार्ताहर
कोरोना संकटामध्ये सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी विविध कामे करत असून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासनाने शिक्षकांना किराणा वाटपाची जबाबदारी दिल्याने शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाकडून शिक्षकांना अपमानास्पद आणि वेठबिगारासारखी वागणुक मिळत असल्याची तक्रार शिक्षकांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. शिक्षकाना किराणा डिलीव्हरीचे दिलेले काम तात्काळ रद्द करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी 28 मे रोजी आदेश क्र.2020/आरबीडेस्क-1/पोल-1/कावि/फौप्रसंक144 अन्वये बीड जिल्ह्यातील 628 शिक्षकांना शहरातील 314 किराणा दुकानावर डिलिव्हरी बॉय म्हणून नियुक्ती केली आहे. वास्तविक पाहता आपत्ती व्यवस्थापन काळात शिक्षकांना समन्वयक अथवा नियंत्रक अशा प्रकारच्या नियुक्त्या देण्यास हरकत नाही. यापूर्वीही जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरूनच शिक्षकांनी चेकपोस्टवर, क्वारंटाईन सेंटरवर व इतर ठिकाणी जबाबदारी पार पाडली आहे. मात्र आतातर चक्क किराणा दुकानावर डिलिव्हरी बॉय म्हणून नियुक्ती केली आहे. शिक्षकांना वेठबिगार समजून अपमानास्पद व अत्यंत हिण दर्जाची वागणुक दिली जात असल्याने सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने निश्चित करण्यात आला आहे. याप्रकरणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून याप्रकरणात लक्ष घालावे अशी मागणीही करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात वाढते कोरोना रुग्ण आणि शहरात लावण्यात आलेली संचारबंदी यामुळे शहरवासीयांना किराणा सामान घरपोहच देण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी रात्रीतून एक आदेश काढला,यामध्ये शहरातील 314 दुकानांवर 600 पेक्षा अधिक शिक्षक हे डिलिव्हरी बॉय म्हणून नियुक्त केले.यातीळ बहुतांश शिक्षकांना तर या आदेशाची दुपारपर्यंत माहिती सुद्धा नव्हती, माहिती मिळाल्यानंतर या शिक्षकांनी प्रशासन आम्हाला वेठबिगार समजते काय? आम्ही ज्ञानदान करायचे की किराणा सामानाच्या पिशव्या पोहच करायच्या असा सवाल केला आहे. अगोदर शिक्षकांना आरोग्य कर्मचारी,नंतर पोलीस,नंतर महसूल विभागासोबत काम करायला लावले. ही सर्व कामे शासकीय आहेत मात्र आता खाजगी किराणा दुकानात किराणा पोहच करणे म्हणजे वेठबिगारी आहे असा सांगत शिक्षकांनी हे काम त्वरित थांबवावे अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
Leave a comment